धनत्रयोदशीचा दिवशी धन्वंतरीची पूजा करुन आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा आशिर्वाद मिळावा, अशी मागणी केली जाते. धन्वंतरीची कृपा मिळवण्यासाठी हा शुभ काळ मानला जातो. धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजा केल्यामुळे वर्षभर आरोग्य चांगलं राहतं. रोगांपासून मुक्ती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. समुद्र मंथनाच्या वेळी धन्वंतरीचा जन्म आयुर्वेदिक औषधांच्या निमिर्तीसाठी झाला. त्यानंतर धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा करण्याची परंपरा सुरु झाली. या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते आणि सोने, चांदी इत्यादी वस्तू खरेदी केल्या जातात. या दिवशी धनाला ज्याप्रमाणे महत्त्व आहे त्याचप्रमाणे धणे आणि गूळ किंवा धणे आणि खडीसाखर यांचा नैवेद्य दाखवण्यालाही विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीला खास धणे-गुळ आणि खडीसाखरेची परंपरा का आहे, जाणून घ्या…
धणे-गुळ किंवा धणे-खडीसाखर
धनत्रयोदशीला धणे-गुळ किंवा धणे-खडीसाखरेचा नैवेद्य दाखवतात कारण या पदार्थांचे धनसमृद्धी, आरोग्य आणि समृद्धीशी नाते आहे. धने हे समृद्धीचे प्रतीक मानले जातात, गुळ आणि खडीसाखर आरोग्यासाठी शुभ आणि गोडवा आणणारे मानले जातात. या पदार्थांच्या नैवेद्याद्वारे घरात धन-धान्याची समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते.
धण्याचे औषधी गुण आणि गुळाचा गोडवा जगण्यात रहावा, आरोग्य लाभावे ही त्यामागची भावना असते. तर लक्ष्मीपूजनाला लाह्या आणि बत्तासे यांचा नैवेद्य दाखवला जातो. पावसाळा संपून थंडी सुरू होण्याच्या सुरुवातीला धणे आणि गूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
धणे
धनत्रयोदशीला धणे खरेदी करणे हे समृद्धीचे आणि भरभराटीचे प्रतीक मानले जाते. शेतकऱ्यांसाठी तर शेतातील नवीन धान्य हेच त्यांचे खरे धन असते. त्यामुळे धने आणि गुळ किंवा खडीसाखर यांचा नैवेद्य दाखवून धनाची पूजा केली जाते. धणे हे समृद्धीशी तसेच आरोग्याशी संबंधित मानले जातात. अॅसिडीटी, अपचन यांसाठी धणे अतिशय चांगले असतात. पचनसंस्थेच्या तक्रारी दूर होण्यासाठी आयुर्वेदात धणे खाण्याचा सल्ला दिला जातो. आमविकार, जुलाब यांसारख्या तक्रारींवरही धणे फायदेशीर असतात. धण्यासोबत गुळ खाल्ल्याने मासिक पाळीवेळी होणारा रक्तस्त्राव कमी होतो आणि वेदनांमध्ये आराम मिळतो. याशिवाय गुळ आणि धने यांचे मिश्रण मासिक पाळी सुरू करण्यासाठी उपयुक्त आहे.
गूळ
गूळ हा लोहाचा उत्तम स्त्रोत मानला जातो. थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता तसेच ऊर्जा मिळण्याची आवश्यकता असल्याने दिवाळीपासून आहारात गुळाचा समावेश करण्यास सुरुवात केली जाते. गुळामध्ये व्हिटॅमिन-बी, कॅल्शियम, जस्त, तांबे आणि फॉस्फरस यांसारखी अनेक खनिजे असतात जी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
खडीसाखर
नेहमीच्या साखरेपेक्षा खडीसाखर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून खडीसाखरेचा वापर होतो. धनत्रयोदशीलाही काही जण गुळाऐवजी धणे आणि खडीसाखरेचा नैवैद्य दाखवतात. पत्री खडीसाखर शरीराला थंडावा देणे, पचनाचे विकार ते मूत्रविकार यासाठी उपयुक्त असते. धण्याचे औषधी गुण आणि खडीसारखरेचा गोडवा जगण्यात रहावा, आरोग्य लाभावे ही त्यामागची भावना असते.
धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. या पदार्थांचा नैवेद्य दाखवून घरात धन-समृद्धी आणि आरोग्याची समृद्धी यावी यासाठी प्रार्थना केली जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






