Ganesh Jayanti 2026 : माघी गणेश जयंती कधी आहे? पूजा-मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या..

Published:
माघी गणेश जयंती 22 जानेवारी 2026 रोजी येत असून, या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवशी केलेल्या पूजेमुळे घरात सुख-समृद्धी येते.
Ganesh Jayanti 2026 : माघी गणेश जयंती कधी आहे? पूजा-मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या..

श्रीगणेशाची आराधना केल्यानंतर प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात होते. गणपती, विघ्नहर्ता, विनायक आणि एकदंत अशा वेगवेगळ्या नावांनी भक्त श्री गणेशाला ओळखतात. त्याच गणेशाचे घरोघरी आगमन होणार असून भाविक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हिंदू पंचांगानुसार गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून ओळखली जाते. यावर्षी गणेश जयंती कधी आहे, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या…

माघी गणेश जयंती कधी आहे?

पंचांगानुसार, यावर्षी माघ शुक्ल चतुर्थी तिथी गुरुवारी 22 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2 वाजून 47 मिनिटांनी सुरू होईल. आणि शुक्रवारी 23 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2 वाजून 28 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार गणेश जयंती गुरुवारी 22 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल.

गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त

यावर्षी गणेश जयंतीला पूजेचा शुभ मुहूर्त 2 तास 8 मिनिटांचा आहे. या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाची पूजा सकाळी 11 वाजून 29 मिनिट ते दुपारी 1 वाजून 37 मिनिटांपर्यंत  करू शकता.

भद्रकाळ

गणेश जयंतीला भद्रा काळ असणार आहे. ज्यामुळे शुभ कार्यात अडथळा येईल, परंतु पूजा करण्यात कोणतेही अडथळे येणार नाहीत. पूजा मुहूर्तानंतर भद्रा काळ लागू होत आहे. गणेश जयंतीला भद्रा काळ दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनीसुरू होईल आणि 23 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2 वाजून 38 मिनिटांपर्यंत असेल. दुपारी भद्राकाळ सुरू होत असल्याने, या काळात कोणतीही नवीन किंवा शुभ कार्ये करणे टाळावे. म्हणूनच पूजा शुभ मुहूर्तात करणे महत्त्वाचे आहे. 

गणेश जयंतीला चंद्र दर्शन करु नये

गणेश जयंतीला चंद्रदर्शन करणे अशुभ मानले जाते. पौराणिक कथेनुसार, गणपतीने चंद्राला शाप दिला होता की जो कोणी या दिवशी चंद्र बघेल, त्याला खोट्या आरोपांचा किंवा कलंकाचा सामना करावा लागेल. गणेश चतुर्थी (भाद्रपद महिन्यातील) आणि माघी गणेश जयंती या दोन्ही दिवशी चंद्राचे दर्शन घेणे वर्जित मानले जाते.

गणेश जयंतीचे महत्व

भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ही मुख्य गणेश चतुर्थी असते, तर माघ महिन्यातील चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला, म्हणून याला गणेश जयंती म्हणतात. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने, या दिवशी त्याची पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे.  या दिवशी गणपतीची विधिवत पूजा, आराधना आणि व्रत केले जाते, ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात. भाद्रपद चतुर्थीला मोदकांचा नैवेद्य असतो, तर माघी गणेश जयंतीला थंडीत तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews