मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा महालक्ष्मी व्रतासाठी महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात गुरुवारी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि धन-धान्य नांदते असे म्हणतात. या व्रतासाठी कलश मांडून पूजा करतात. देवी लक्ष्मीची पूजा करून रात्री गोड-धोड नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. या व्रताच्या निमित्ताने स्त्रियांना हळदी कुंकू लावून वाण दिले जाते. या व्रतामुळे ऐश्वर्य, यश आणि धन-संपत्ती प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे.
या दिवसाचे महत्त्व
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे महालक्ष्मी देवीला समर्पित असतात. या दिवशी व्रत केल्याने कुटुंबात सुख, समृद्धी आणि धनधान्य येते अशी श्रद्धा आहे. उद्यापन केल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही असे मानले जाते. या महिन्यात केलेले दानधर्म आणि पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो, असे धार्मिक ग्रंथ सांगतात. भगवान श्रीकृष्णाची पूजा आणि नामस्मरण करणेही या महिन्यात महत्त्वाचे मानले जाते. गरजू लोकांना अन्न, वस्त्र, गूळ, तूप, तांदूळ किंवा इतर उपयुक्त वस्तू दान कराव्यात. यामुळे पुण्य मिळते आणि मनःशांती लाभते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी क्रूर बोलणे किंवा वाईट विचारांपासून दूर राहावे.
उद्यापनाच्या दिवशी घ्यायची विशेष काळजी
- उद्यापन शक्यतो सायंकाळी करावे, कारण लक्ष्मी देवी सायंकाळी घरात येते, असे मानले जाते.
- सायंकाळी घराची स्वच्छता करून दारात सुबक रांगोळी काढावी. घरात धूप, दीप आणि अगरबत्ती लावावी.
- उंबरठ्याला हळदीचा लेप लावावा आणि लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढावी, हे अत्यंत शुभ मानले जाते.
- १, ३, ५, ७ किंवा ११ अशा विषम संख्येने सुवासिनींना घरी बोलवावे. त्यांना देवीचे स्वरूप मानून पूजा करावी.
- दर गुरुवारी जशी पूजा केली, तशीच पूजा करावी, देवीला शृंगार अर्पण करावा, कथा वाचावी.
- सुवासिनींना हळदी-कुंकू, गजरा, शृंगाराचे सामान देऊन ओटी भरावी.
- देवीला खीरीचा नैवेद्य दाखवून ती सुवासिनींना द्यावी आणि त्यांना कथेचे पुस्तक व फळ द्यावे. शक्य असल्यास जेवू घालावे.
- सर्व पूजा आणि व्रतकथा विधिवत पूर्ण कराव्यात, कारण उद्यापनाशिवाय व्रत पूर्ण होत नाही.
- प्रसन्न मनाने देवीची पूजा केल्यास या व्रताचे संपूर्ण फळ मिळते अशी मान्यता आहे.
- दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) सकाळी कलश आणि घटकाचे विसर्जन करावे.
- व्रताच्या दिवशी मांस, मद्य, लसूण आणि जिरे यांचे सेवन टाळावे. तसेच कुणाचीही निंदा-नालस्ती करू नये. वाईट बोलू नये.
- गरजू व्यक्तींना अन्न, कपडे किंवा पैसे दान करणे खूप फलदायी ठरते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





