Wed, Dec 24, 2025

Vinayaka Chaturthi 2025 : विनायक चतुर्थीला चंद्र पाहणे अशुभ का मानले जाते? जाणून घ्या..

Published:
विनायक चतुर्थीला चंद्रदर्शन केल्यास खोटा आरोप किंवा खोटा कलंक लागतो, अशी धार्मिक मान्यता आहे. विनायक चतुर्थीला गणपतीची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात, अशी श्रद्धा आहे.
Vinayaka Chaturthi 2025 : विनायक चतुर्थीला चंद्र पाहणे अशुभ का मानले जाते? जाणून घ्या..

हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते. शास्त्रानुसार, गणपती पूजनाशिवाय कोणतेच धार्मिक कार्य आणि पूजाविधी संपन्न होत नाही. गणपतीला बुधवार व चतुर्थी तिथी समर्पित आहे. या दिवशी गणपतीची विशेष पूजा केली जाते. सध्या पौष महिना सुरु असून पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला म्हणजेच उद्या 24 डिसेंबर 2025 रोजी विनायक चतुर्थी आहे. तुम्हीही चतुर्थीचे व्रत पाळत असाल तर या दिवशी चंद्रदेवाचे दर्शन करु नका. शास्त्रानुसार विनायक चतुर्थीला चंद्रदर्शन वर्ज्य मानले जाते. या मागे काय कारण आहे जाणून घेऊया…

विनायक चतुर्थीला चंद्र पाहणे अशुभ का मानले जाते?

शास्त्राप्रमाणे, प्रत्येक महिन्यात विनायक चतुर्थी (शुक्ल पक्षातील) आणि संकष्टी चतुर्थी (कृष्ण पक्षातील) अशा दोन गणपतीला समर्पित चतुर्थी तिथी असतात. ज्यात संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शनाने व्रत सोडतात, तर विनायक चतुर्थीला चंद्रदर्शन अशुभ मानले जाते, कारण त्यामुळे खोटा आरोप किंवा कलंक लागू शकतो.

पौर्णिमेनंतर येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी, या दिवशी चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडला जातो आणि यालाच संकटहार चतुर्थी असेही म्हणतात. अमावस्येनंतर येणारी शुक्ल पक्षातील चतुर्थी, या दिवशी चंद्रदर्शन वर्ज्य मानले जाते.

पौराणिक कथा

गणपती आपल्या वाहनावर बसून असताना चंद्राने त्यांची खिल्ली उडवली आणि हसले. यामुळे गणपती क्रोधीत झाले आणि त्यांनी चंद्राला शाप दिला की चतुर्थीला तुला पाहणाऱ्यावर खोटा आरोप येईल. या शापामुळे श्रीकृष्णावर ‘स्यमंतक’ नावाचे मौल्यवान रत्न चोरल्याचा आरोप लागला होता. खोट्या आरोपात अडकलेल्या कृष्णाची अवस्था पाहून महर्षी नारद यांनी सांगितले की, श्रीकृष्णांनी विनायक चतुर्थीला चंद्रदर्शन केले होते, त्यामुळेच श्रीकृष्ण खोट्या आरोपात अडकले.

यावर महर्षी नारद यांनी सांगितले की, गणपतीने चंद्रदेवाला शाप दिला होता की, शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या वेळी चंद्र पाहणाऱ्याला खोट्या आरोपाचा सामना करावा लागेल. ती व्यक्ती समाजात चोरीच्या खोट्या आरोपाने कलंकित होईल. त्यानंतर, महर्षी नारद यांच्या सांगितल्याप्रमाणे, श्रीकृष्णांनी खोट्या दोषांपासून मुक्त होण्यासाठी श्रीकृष्णाने गणपतीची पूजा करून आणि व्रत करून हा दोष दूर केला, आणि खोट्या आरोपातून त्यांची मुक्ताता झाली. तेव्हापासून भक्त या दिवशी चंद्रदर्शन करणे टाळतात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)