Bhishma Dwadashi 2026 : भीष्म द्वादशी व्रतामागची पौराणिक कथा वाचा…

Published:
महाभारत युद्धानंतर पितामहांनी शरशय्येवरून युधिष्ठिराला राज्यधर्माचे ज्ञान दिले. जेव्हा सूर्य उत्तरायणात प्रवेश करत होता, तेव्हा भीष्म पितामहांनी आपल्या शरीराचा त्याग केला. त्यांच्या असीम ज्ञानाचा, त्यागाचा आणि पितृभक्तीचा सन्मान करण्यासाठी हा दिवस पवित्र मानला जातो.
Bhishma Dwadashi 2026 : भीष्म द्वादशी व्रतामागची पौराणिक कथा वाचा…

माघ महिन्यातील द्वादशीला भीष्मद्वादशी म्हटले जाते. महाभारतात पितामह म्हणून ओळख असलेल्या गंगापुत्र देवव्रत म्हणजे भीष्माचार्यांनी माघ शुद्ध अष्टमी रोजी आपला देह ठेवला. मात्र, त्यांची उत्तरक्रिया माघ शुद्ध द्वादशीला करण्यात आली. म्हणून या द्वादशीला भीष्म द्वादशी म्हटले जाते.

भीष्म द्वादशी व्रतामागची पौराणिक कथा

भीष्म द्वादशी (माघ शुक्ल द्वादशी) भीष्म पितामह यांच्या सन्मानार्थ साजरी केली जाते, ज्या दिवशी पांडवांनी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण केले होते. महाभारताच्या युद्धात बाणांच्या शय्येवर पडून राहिल्यानंतर, उत्तरायण सुरू झाल्यावर अष्टमीला प्राण त्यागलेल्या भीष्मांच्या स्मरणार्थ, त्यानंतरच्या चार दिवसांनी (द्वादशीला) हा दिवस पवित्र मानून उपवास आणि पूजा केली जाते.

महाभारताच्या युद्धात मृत्यू येऊनही अर्जुनाला सांगून भीष्म पितामहांनी शरशय्या बनवून घेतली. त्यांना इच्छा मरणाचे वरदान होते. ते जखमी झाले तेव्हा दक्षिणायन सुरु होते. उत्तरायण सुरु होण्यास काही दिवस बाकी होते. उत्तरायणात मरण आले असता सद्गती लाभते असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. म्हणून त्यांनी माघ शुद्ध अष्टमीला सूर्याला वंदन करून प्राण सोडले. भीष्म पितामह यांच्या निधनानंतर, तीन दिवसांनी म्हणजे माघ शुद्ध द्वादशीला पांडवांनी त्यांचे तर्पण आणि श्राद्ध केले, म्हणून या दिवसाला ‘भीष्म द्वादशी’ म्हटले जाते. भीष्म पितामहांना जशी सद्गती लाभली तशी आपल्याला आणि आपल्या पूर्वजांनाही लाभावी व पितृदोषातून आपली सुटका व्हावी म्हणून हे व्रत केले जाते. या दिवशी भीष्माचार्यांच्या स्मरणार्थ कुश (एक प्रकारचे गवत), तीळ आणि पाण्याने श्राद्ध व तर्पण केले जाते. या व्रतामुळे संतती प्राप्ती आणि पितरांना मोक्ष मिळतो, असे मानले जाते.

भीष्म द्वादशी महत्त्व

भीष्म पितामहांच्या निस्सीम त्याग आणि पितृभक्तीचा हा दिवस गौरव करतो. या दिवशी उपवास केल्याने सर्व भौतिक सुख, समृद्धी आणि शेवटी विष्णू लोक प्राप्त होतो असे मानले जाते. आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवशी ‘भीष्म तर्पण’ केले जाते. या दिवशी गरजूंना अन्नदान आणि दान करणे पुण्यकारक मानले जाते.

पूजा विधी

या दिवशी पहाटे स्नान करून भीष्म पितामह आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. अनेकजण या दिवशी व्रत ठेवतात आणि ‘विष्णू सहस्रनाम’ स्तोत्राचे पठण करतात, कारण भीष्मांनी शरशय्येवर असताना युधिष्ठिराला विष्णू सहस्रनाम सांगितले होते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews