Jaya Ekadashi 2026 : जया एकादशीच्या दिवशी वाचा ‘ही’ व्रत कथा, मिळेल पिशाच योनीतून मुक्ती…

Published:
जया एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान श्रीहरीचे ध्यान करावे. देवाला फळे आणि नैवेद्य अर्पण करा आणि ही व्रत कथा वाचा...
Jaya Ekadashi 2026 : जया एकादशीच्या दिवशी वाचा ‘ही’ व्रत कथा, मिळेल पिशाच योनीतून मुक्ती…

गुरुवार, 29 जानेवारी 2026 रोजी जया एकादशीचे व्रत आहे. या दिवशी एकादशीचा उपवास करून श्रीहरी विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. हे एकादशीचं व्रत केल्यानं आत्म्यांना भूत, प्रेत, पिशाच योनी यांपासून मुक्ती मिळते. विष्णुपूजेच्या वेळी जया एकादशीची व्रत कथा ऐकावी. जाणून घेऊया जया एकादशीची पौराणिक कथा..

जया एकादशीचे महत्त्व

माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी जया एकादशी भगवान विष्णूंना समर्पित असून ती पापांचे निर्मूलन, मोक्ष आणि आर्थिक उन्नतीसाठी अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी उपवास, विष्णू पूजा आणि तीळ दान केल्याने भक्ताच्या संकटांचे निवारण होते. ही एकादशी व्रत, दान आणि भक्तीद्वारे मन शुद्धीसाठी खास ओळखली जाते. या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारच्या पापांतून मुक्ती मिळते. आयुष्यातील आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. या दिवशी व्रत केल्याने पूर्वजांना भुत-पिशाच योनीतून मुक्ती मिळते व पितृदोष दूर होतो.

जया एकादशी व्रत कथा

पौराणिक कथेनुसार, देवराज इंद्र स्वर्गात राज्य करत होते. सर्व देवदेवता स्वर्गात सुखाने वावरत होत्या. एकदा इंद्रदेव अप्सरांसोबत सुंदरबनला भेटायला गेले. त्यांच्यासोबत गंधर्वही होते. त्यात अप्सरा पुष्पावती आणि गंधर्व मल्यवानही होते. त्या वेळी पुष्पावतीने मल्यवानला पाहिले आणि त्याच्या प्रेमात पडली. मल्यवाननेही तिला पाहिले आणि तोही तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला. ते दोघेही भगवान इंद्राला प्रसन्न करण्यासाठी नाचत आणि गात होते. पण दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले होते, त्यामुळे त्यांचे मन विचलित झाले होते. त्यामुळे गाताना त्याची लय बिघडली. यावर इंद्राने क्रोधित होऊन गंधर्व आणि त्याच्या पत्नीला पिशाच योनीत जन्म घेण्याचा शाप दिला. ते म्हणाले की, आतापासून तुम्ही दोघे स्वर्गातून पृथ्वीवर राहाल आणि तेथे तुम्हाला पिशाच्चाच्या रूपात दुःख भोगावे लागेल.

शापामुळे माल्यवान आणि पुष्पावती हिमालयात आले आणि पिशाच योनीत दुःखी जीवन जगू लागले. पिशाच योनीत जन्म घेतल्यानंतर पती-पत्नीला त्रास होत होता. योगायोगाने माघ शुक्ल एकादशीच्या दिवशी दुःखाने व्याकूळ झाल्याने दोघांनीही काही खाल्ले नाही सूर्यास्ताच्या वेळी त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली बसून रात्र काढली. त्या रात्री त्यांना थंडीमुळे झोप येत नव्हती, अशाप्रकारे नकळत त्यांनी जया एकादशीचे व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने दोघेही शाप मुक्त झाले आणि मूळ स्वरुपात परतले आणि स्वर्गात पोहोचले. जेव्हा देवराज इंद्राने गंधर्वांना त्यांच्या वास्तविक रूपात पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. गंधर्व आणि त्यांच्या पत्नीने सांगितले की त्यांनी नकळत जया एकादशीचे व्रत केले. या व्रताच्या पुण्यमुळे त्याला पिशाच योनीतून मुक्ती मिळाली.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews