मौनी अमावस्येचे व्रत स्नान, दान, तर्पण आणि मौन यांसाठी महत्त्वाचे आहे, ज्यामुळे पापनाश, पुण्यप्राप्ती, पितृदोषमुक्ती व घरात सुख-समृद्धी येते. या दिवशी मौन पाळणे, पूजा करणे, तसेच अन्न, वस्त्र, तीळ, तूप दान करणे अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे वंशवृद्धी व सौभाग्य लाभते अशी श्रद्धा आहे.
मौनी अमावस्येचे महत्त्व
मौनी अमावस्या या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो. पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देतात, ज्यामुळे वंशवृद्धी होते. या दिवशी मौन पाळणे महत्त्वाचे असते. यामुळे मन एकाग्र होते आणि आध्यात्मिक शक्ती मिळते. ‘मौनी’ या शब्दाचा अर्थ ‘मौन’ असा असल्याने, या दिवशी मौन पाळणे महत्त्वाचे मानले जाते. यामुळे मन शांत राहते आणि आध्यात्मिक शक्ती मिळते, असे म्हणतात. पूर्वजांना (पितरांना) समर्पित असलेला हा दिवस आहे. त्यांच्या शांतीसाठी आणि पितृदोषापासून मुक्तीसाठी या दिवशी श्राद्ध, तर्पण आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे.
मौनी अमावस्या व्रत कथा
पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी कांचीपुरी नावाच्या नगरात एक ब्राह्मण परिवार राहत होता. पती-पत्नी दोघेही धर्मात्मा होते आणि शास्त्र धर्माने आपली गृहस्थी चालवत होते. पतीचे नाव देवस्वामी आणि पत्नीचे नाव धनवती होते. त्यांना सात मुलगे आणि एकच मुलगी होती, तिचे नाव गुणवती होते. गुणवती आता मोठी झाली होती. ती विवाहयोग्य झाली होती. धनवतीने देवस्वामीला सांगितले, आता मुलीच्या लग्नासाठी वर शोधायला हवा. ब्राह्मणाने आपल्या धाकट्या मुलाला बोलावले आणि गुणवतीची कुंडली त्याला दिली आणि सांगितले, ‘ज्योतिषाकडून गुणवतीची कुंडली दाखवून घे, ज्यामुळे गुणवतीच्या लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकतील.’ ज्योतिषाला मुलीची कुंडली दाखवली तेव्हा त्याने सांगितले की लग्न होताच मुलगी विधवा होईल. ज्योतिषीची ही बातमी जेव्हा ब्राह्मण कुटुंबाला कळली तेव्हा ते खूप दुःखी झाले आणि त्याचा उपाय विचारला.
ज्योतिषी म्हणाला, हे ब्राह्मणा, सिंहलद्वीपात सोमा धोबिण नावाची एक पतीव्रता स्त्री राहते. जर लग्नापूर्वी सोमा तुमच्या घरी येऊन पूजन करेल आणि तुम्हाला आशिर्वाद देईल तर हा दोष दूर होईल. ब्राह्मणाने आपली मुलगी गुणवती आपल्या धाकट्या मुलासोबत सिंहलद्वीपला पाठविली. दोन्ही भाऊ-बहीण समुद्रकिनारी पोहोचून त्याला पार करण्याचा विचार करू लागले. जेव्हा समुद्र पार करण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही तेव्हा दोघेही भूक आणि तहानलेले एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी गेले. त्या झाडावर गिधाडाचं कुटुंब राहत होतं. त्यावेळी घरट्यात फक्त गिधाडाची पिल्ले होते. ती सकाळपासून भाऊ-बहिणीच्या बोलण्याकडे आणि कृतींकडे पाहत होती.
संध्याकाळी जेव्हा गिधाडाची आई पिल्लांसाठी अन्न घेऊन घरट्यात आली तेव्हा पिल्लांनी झाडाखाली झोपलेल्या भाऊ-बहिणीची कहाणी आईला सांगितली. त्यांचे बोलणे ऐकून गिधाडाच्या आईला दोन्ही भाऊ-बहिणींवर दया आली आणि पिल्लांच्या आग्रहावर ती म्हणाली, “तुम्ही काळजी करू नका, मी त्या दोघांना समुद्र पार करण्यासाठी मदत करेन.” मुलांना आईचे बोलणे ऐकून आनंद झाला. तिने मुलांना जेवू घातले आणि ती दोन्ही भाऊ-बहिणींकडे आली आणि म्हणाली, “मी तुमच्या समस्या समजून घेतल्या आहेत. तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या समस्येचे निदान करून तुम्हाला सोमा धोबिनकडे पोहोचवून देईन.” गिधाडाचे बोलणे ऐकून दोन्ही भाऊ-बहिणींचे मन आनंदित झाले आणि त्यांनी जंगलात उपलब्ध असलेली कंदमुळं खाऊन रात्र काढली. सकाळ होताच गिधाडाने दोन्ही भाऊ-बहिणींना समुद्र पार करवून सिंहलद्वीपात सोमा धोबिणीच्या घराजवळ पोहोचवले.
गुणवती सोमा धोबिणीच्या घराजवळ लपून वास्तव्य करु लागली. दररोज सकाळी उठण्यापूर्वी गुणवती सोमाचे घर आणि अंगण सारवून ठेवत असे. एके दिवशी सोमाने आपल्या सुनांना विचारले, “दररोज सकाळी आपले घर कोण सारवून ठेवते आहे?” सुनांना वाटले आता आपले कौतुक होणार आहे म्हणून त्यांनी सांगितले,”आमच्याशिवाय हे काम कोण करणार?” पण सोमाने सुनांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि हे जाणून घेण्यासाठी ती संपूर्ण रात्र पहारा देत बसली. कोण आहे जो दररोज सूर्योदयापूर्वी आपलं घर छान सारवून ठेवतो आहे हा विचार तिच्या मनातून जात नव्हता. तेव्हढ्यात सोमाने पाहिले की, एक मुलगी तिच्या अंगणात आली आणि अंगण सारवायला लागली. सोमा गुणवतीकडे गेली आणि तिला विचारू लागली, “तू कोण आहेस आणि का दररोज सकाळी माझ्या घराचे अंगण सारवून ठेवते आहेस.” गुणवतीने आपली कहाणी तिला सांगितली. गुणवतीचे बोलणे ऐकून सोमा म्हणाली, “तुझ्या सौभाग्यासाठी मी तुझ्यासोबत नक्कीच येईन.”
सोमाने ब्राह्मणाच्या घरी येऊन पूजा केली, पण विधीचे विधान कोण टाळू शकते. गुणवतीचा विवाह होताच तिच्या पतीचा मृत्यू झाला. तेव्हा सोमाने आपले सर्व पुण्य गुणवतीला दान केले. सोमाच्या पुण्याने गुणवतीचा पती जिवंत झाला. पण पुण्यांच्या कमतरतेमुळे सोमाच्या पती आणि मुलांचा मृत्यू झाला. पण सोमाने आपले घर सोडण्यापूर्वी सुनांना सांगितले होते की माझ्या परतण्यापूर्वी जर माझ्या पती आणि मुलांना काही झाले तर त्यांचे शरीर सांभाळून ठेवा. सुनांनी सासूबाईंची आज्ञा मानून सर्वांचे शरीरांना सांभाळून ठेवले होते. सोमा सिंहलद्वीपला परतताना रस्त्यातच तिने पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विष्णुजींची पूजा करून १०८ वेळा पिंपळाच्या प्रदक्षिणा केली. त्या पुण्याच्या प्रभावामुळे सोमा घरी परतताच तिचे पती आणि मुले पुन्हा जिवंत झाली. म्हणूनच मौनी अमावस्या व्रत करणार्यांनी ही कथा ऐकून १०८ वेळा पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी आणि भगवान विष्णू यांच्यासह शिवजींची पूजाही करावी.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






