Maghi Ganesh Jayanti 2026 : माघी गणेश जयंती! अशी करा बाप्पाची आराधना, वाचा पूजा पद्धत…

Published:
माघी गणेश जयंती हे गणरायाच्या जन्मोत्सवाशी जोडलेले आहे, या दिवशी गणरायाने 'महोत्कट विनायक' रूपात जन्म घेतला म्हणून याला विनायकी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणतात. या दिवशी तिळगुळाचे लाडू अर्पण करून विधिवत पूजा केल्यास सुख-समृद्धी येते व अडथळे दूर होतात.
Maghi Ganesh Jayanti 2026 : माघी गणेश जयंती! अशी करा बाप्पाची आराधना, वाचा पूजा पद्धत…

हिंदू धर्मात कोणत्याही विधी किंवा पूजेपूर्वी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. माघ महिन्यात गणेश जयंती हा पवित्र सण साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, हा सण दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. माघी गणेश जयंतीला ‘विनायकी चतुर्थी’ किंवा ‘तिलकुंद चतुर्थी’ असंही म्हणतात. गणेश जयंतीच्या दिवशी व्रत करून श्री गणेशाची यथोचित उपासना केल्यास श्रीगणेशाच्या आशीर्वादाने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

माघी गणेश जयंतीचे महत्त्व 

भाद्रपदातील गणेश चतुर्थी गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरी होते, तर माघ महिन्यातील चतुर्थीला गणरायाने ‘महोत्कट विनायक’ रूपात अवतार घेतला, म्हणून हा दिवस जन्मोत्सव म्हणून साजरा होतो. या दिवसाला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणतात. या दिवशी तिळाचा वापर केला जातो, कारण तिळ हे पवित्रता आणि आत्मशुद्धीचे प्रतीक आहे. मोदकांसोबतच तिळगुळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करणे महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी व्रत, पूजा, दान, जप केल्यास गणपती प्रसन्न होऊन जीवनातील सर्व अडथळे दूर करतो, अशी श्रद्धा आहे.

माघी गणेशोत्सवातील पूजा कशी करावी?

  • गणेश जयंतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पहाटे उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
  • समईला गंध, फूल आणि हळद-कुंकू लावा.
  • दुर्वांनी गणपतीच्या मूर्तीवर आणि स्वतःवर पाणी शिंपडा.
  • दोन दुर्वांकुरांनी गणपतीच्या मूर्तीला स्पर्श करून प्राणप्रतिष्ठा करा आणि ताम्हनात एक पळी पाणी सोडा.
  • गणपतीचे आवाहन करून त्यांना पूजेसाठी आमंत्रित करा.
  • गणपतीला पाणी अर्पण करून, हळद, चंदन, कुंकू, फुले वाहून स्नान घाला.
  • गणपतीला नवीन वस्त्र किंवा कापसाचे वस्त्र अर्पण करा.
  • अक्षता आणि फुले वाहून त्यांची पूजा करा.
  • २१ दुर्वांची पूजा करा (प्रत्येक दुर्वेवर ‘ॐ गं गणपतये नमः’ म्हणत).
  • धूप आणि दीप लावा.
  • तिळाचे लाडू, मोदक किंवा गुळाचा नैवेद्य दाखवा. मोदक हे गणपतीचे आवडते मिष्टान्न आहे, विशेषतः या दिवशी तिळाचा वापर महत्त्वाचा असतो.
  • ‘ॐ गं गणपतये नमो नमः’ किंवा ‘गणपती अथर्वशीर्ष’ याचा जप करा.
  • गणपतीची आरती करा.
  • गणपतीला प्रदक्षिणा घालून नमस्कार करा. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)