Maghi Ganesh Jayanti 2026 : माघ महिन्यात गणेश जयंती का साजरी केली जाते? जाणून घ्या…

Published:
उद्यापासून 'माघी गणेश जयंती' मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाइतकेच महत्त्व माघ शुद्ध चतुर्थीला आहे, कारण या दिवशी भगवान गणेशाने 'महोत्कट विनायक' रूपात अवतार घेतला होता.
Maghi Ganesh Jayanti 2026 : माघ महिन्यात गणेश जयंती का साजरी केली जाते? जाणून घ्या…

हिंदू धर्मशास्त्रानुसार, उद्या म्हणजेच 22 जानेवारी 2026 रोजी देशभरात माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. गणेशोत्सव हा भाद्रपद महिन्यात साजरा केला जातो. पण मग माघ महिन्यात गणेश जयंती का साजरी केली जाते. या दिवसाची सुरुवात नेमकी कशी झाली ? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

पौराणिक कथा

पुराणांनुसार, गणपतीने पृथ्वीवरील दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी अनेक अवतार घेतले. त्यापैकी एक म्हणजे माघ शुद्ध चतुर्थीला घेतलेला ‘महोत्कट विनायक’ हा अवतार, म्हणून या दिवसाला ‘गणेश जयंती’ म्हणतात.

पौराणिक कथेनुसार, देवांतक आणि नरांतक या राक्षसांच्या त्रासापासून त्रैलोक्याचे रक्षण करण्यासाठी गणपतीने हा अवतार घेतला. देवांतक आणि नरांतक या राक्षसांनी सगळीकडे हा-हाकार माजवला होता. त्यांचा वध करण्यासाठी कश्यप ऋषींच्या पोटी बाप्पांनी जन्म घेतला. त्याचे नाव महोत्कट विनायक असे ठेवले गेले. महोत्कट विनायक या अवताराने पुढे जाऊन या राक्षसांना संपवलं. हा अवतार माघ महिन्याच्या चतुर्थीला जन्माला त्यामुळे या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते.

या दिवशी गणपतीने नरांतक राक्षसाचा वध केला, म्हणून हा दिवस विजय, संरक्षण आणि विघ्ननाशाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी केलेल्या पूजेने सर्व संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे. 

‘तिलकुंद’ चतुर्थी का म्हणतात?

माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला गणेशाचा ‘महोत्कट विनायक’ या अवतारात जन्म झाला म्हणून ‘गणेश जयंती’ साजरी करतात, यालाच ‘तिलकुंद चतुर्थी’ म्हणतात कारण या दिवशी तिळाचे पदार्थ (लाडू, मोदक) अर्पण करतात आणि थंडीत तिळाचे महत्त्व आहे.’तिल’ म्हणजे तीळ आणि ‘कुंद’ म्हणजे पांढरी फुले. या दिवशी गणपतीला तिळाचे लाडू, मोदक किंवा तीळ-गुळाचे पदार्थ अर्पण करण्याची परंपरा आहे. थंडीच्या दिवसात तिळाचे सेवन आरोग्यासाठी चांगले मानले जाते, म्हणून याला ‘तिलकुंद चतुर्थी’ म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews