Bornhan : मकर संक्रांतीच्या काळात लहान मुलांना बोरन्हाण का घालतात? जाणून घ्या यामागील कारण

Published:
मकर संक्रांतीला लहान मुलांचे केले जाणारे बोरन्हाण हा एक पारंपरिक सोहळा आहे, जो मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, त्यांना आरोग्यदायी पदार्थ खाण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाईट ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो.
Bornhan : मकर संक्रांतीच्या काळात लहान मुलांना बोरन्हाण का घालतात? जाणून घ्या यामागील कारण

मकर संक्रांत नवीन वर्षातील पहिला सण असून तो देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मकर संक्रांत सणामध्ये तिळगुळ देणे, पतंग उडवणे आणि हळदी-कुंकवाचे कार्यक्रम यांसारख्या परंपरा असल्यामुळे, सर्वजण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. संक्रांतीनिमित्त लहान मुलांचे बोरन्हाण करण्याची जुनी प्रथा आहे. पण हे बोरन्हण का घातलं जातं आणि त्याची तयारी कशी केली जाते? हे जाणून घेऊया….

बोरन्हाण का करतात?

थंडीच्या दिवसांत शरीरात उष्णता निर्माण करणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे बोरं, ऊस, तीळ, शेंगा यांसारखे पदार्थ या काळात मुलांना खायला मिळावेत म्हणून हा सोहळा करतात. यामुळे मुलांना बदलत्या ऋतूमानाची बाधा होत नाही. बोरन्हाण हा एक पारंपरिक विधी असून, तो मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांना वाईट शक्तींपासून वाचवण्यासाठी केला जातो, तसेच तो एक आनंददायी सोहळाही आहे. 

काय आहे आख्यायिका? 

बोरन्हाणसंदर्भात अशीही एक आख्यायिका आहे की, पूर्वी करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये, यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केलं गेलं आणि त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण केलं जातं. त्यामुळे राक्षसापासून लहान मुलांचं संरक्षण करण्यासाठी ही प्रथा आजही पाळली जाते.

बोरन्हाण करण्याची पद्धत

  • १ ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना बाळाला काळ्या रंगाचे कपडे (झबले, फ्रॉक) घातले जातात, कारण काळा रंग उष्णता शोषून घेतो. त्यावर हलव्याचे दागिने (हार, पैंजण, वाकी) घालून त्याला सजवतात.
  • बोरं, ऊस, हरभरे, शेंगा, तिळाचे लाडू, मुरमुरे, बत्तासे, चॉकलेट्स, गोळ्या अशा विविध वस्तू एकत्र केल्या जातात.
  • बाळाला सजवून एका जागी बसवतात. त्यानंतर, एकत्र केलेले सर्व पदार्थ हळूवारपणे बाळाच्या डोक्यावरून खाली टाकले जातात, जणू काही त्याला या पदार्थांनी अंघोळ घातली जात आहे. त्यानंतर त्याचे औक्षण केले जाते.
  • सोहळ्यासाठी आलेल्या इतर लहान मुलांना ते पदार्थ वेचून घरी नेण्यास सांगितले जाते. यामुळे त्यांनाही आनंद मिळतो आणि हा उत्सव साजरा होतो.
  • आलेल्या पाहुण्यांना (लेकुरवाळ्यांना) हळद-कुंकू लावून, तिळगूळ देऊन त्यांचे आदरातिथ्य केले जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)