हिंदू धर्मात प्रदोष व्रताला अत्यंत महत्व आहे. हे व्रत भगवान शंकराला समर्पित असतात. फेब्रुवारी महिन्यात भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे पहिले शनि प्रदोष व्रत 14 फेब्रुवारी 2026 रोजी पाळले जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला हा शुभ योग जुळून येत असून, या दिवशी शिवभक्तांना भगवान महादेव आणि शनिदेव या दोघांचाही आशीर्वाद एकाच वेळी मिळणार आहे. विशेषतः शनिदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि सुख-समृद्धी प्राप्तीसाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
पहिला शनि प्रदोष कधी आहे?
फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 14 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजून 2 मिनिटांनी सुरु होईल. त्रयोदशी तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 फेब्रुवारी रविवारी सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी संपेल. म्हणून, उदयतिथीनुसार 2026 फेब्रुवारी महिन्यातील पहिले प्रदोष व्रत 14 फेब्रुवारी रोजी केले जाईल. प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. शास्त्रांनुसार, या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शिवाची पूजा केल्याने भक्ताचे सर्व दुःख दूर होतात.
पूजेचा शुभ मुहूर्त
प्रदोष व्रत पूजा संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी सुरू करावी. ही पूजा रात्री 8 वाजून 44 मिनिटांपर्यंत करता येणार आहे. 14 फेब्रुवारी 2026 रोजी येणाऱ्या शनि प्रदोष व्रतासाठी हा 2 तास 34 मिनिटांचा कालावधी शिवपूजेसाठी अत्यंत फलदायी ठरेल. धार्मिक मान्यतेनुसार, प्रदोष काळात महादेव कैलास पर्वतावर प्रसन्न मुद्रेत नृत्य करतात, त्यामुळे या वेळी केलेली प्रार्थना लवकर स्वीकारली जाते.






