गणेश जयंती म्हटली की लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण आतुर असतो. यंदा 23 जानेवारीला माघी गणेश जयंती साजरी होत आहे, या दरम्यान तुम्ही बाप्पाला त्याच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकता. गणपतीला ‘मोदक’ प्रिय असले, तरी माघी चतुर्थीला तिळाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी गणपतीला ‘तिळकुंदा’ किंवा तिळाच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण केल्यास तो प्रसन्न होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळेच अनेक ठिकाणी या दिवसाला ‘तिळकुंद चतुर्थी’ असेही म्हणतात.
गणपतीला का दाखवला जातो तिळाचा नैवेद्य?
पौराणिक कथांनुसार, माघ महिन्यात तिळ हे गणपतीला प्रिय मानले जाते आणि तिळकुंड चतुर्थीला तिळाचे सेवन केल्याने किंवा दान केल्याने पापे नष्ट होतात, तसेच थंडीत शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळते, म्हणून गणपतीला तिळाचा नैवेद्य दाखवून त्याचे महत्त्व वाढवले जाते. थंडीच्या दिवसात तीळ खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि उष्णता टिकून राहते. त्यामुळे, थंडीत गणपतीला तिळाचे लाडू अर्पण करणे आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर मानले जाते. माघी गणेश जयंतीला गणपतीला तिळाचे लाडू अर्पण करणे हा एक धार्मिक विधी आहे, जो गणपतीला प्रिय असण्यासोबतच शरीराला थंडीपासून वाचवतो आणि पुण्य मिळवून देतो.
तिळाच्या लाडूची सोपी रेसिपी
साहित्य
- पांढरे तीळ
- गूळ (बारीक चिरलेला)
- शेंगदाणे
- वेलची पूड
- तूप
कृती
- पांढरे तीळ मंद आचेवर कोरडे भाजून घ्या, ते फुटू लागले की काढून घ्या आणि थंड झाल्यावर थोडे जाडसर वाटून घ्या.
- शेंगदाणे भाजून सालं काढून जाडसर कुटून घ्या.
- एका कढईत थोडं तूप गरम करून त्यात गूळ घाला आणि मंद आचेवर वितळवा.
- गूळ वितळल्यावर त्यात भाजलेले तीळ आणि कुटलेले शेंगदाणे घालून चांगलं मिक्स करा.
- मिश्रण थोडं घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
- हाताला तूप लावून मिश्रणाचे छोटे लाडू वळा.
माघी गणेश जयंती आणि मकर संक्रांती या सणांमध्ये तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून दाखवले जातात, जे पौष्टिक आणि आरोग्यदायी असतात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





