Chanakya Niti In Marathi:   आचार्य चाणक्य हे आपल्या काळातील अत्यंत हुशार आणि विद्वान व्यक्तिमत्व होते. त्यांनी आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींबाबत अचूक आणि स्पष्ट नियम मांडले आहेत. त्यांच्या या नियमांच्या आधारे प्रत्येक अडचणीवर मात करणे सोपे जाते. त्यांनी कोणत्या परिस्थिती कोणाशी कसे वागावे याबाबतही सांगितले आहे.

आजही लोक आचार्य चाणक्यांचे नियम फॉलो करतात. आयुष्यातील वेगवेगळ्या बाबींमध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी लोक चाणक्य नीतीचा अवलंब करतात. त्यामुळे त्यांना यश तर मिळतेच शिवाय सुखसमृद्धीही येते. आचार्य चाणक्यांनी आपल्या शत्रूवर मात करण्याचे काही सोपे नियम सांगितले आहेत. आज आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.

आचार्य चाणक्यांच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती यशस्वी होते. तेव्हा तिच्या भोवती शत्रूंची संख्यादेखील वाढते. या लोकांना त्यांचे यश पाहवत नाही. त्यामुळे असे लोक नेहमीच त्यांना खाली ओढायचा प्रयत्न करतात. वेगवेगळ्या योजना आखून कमीपणा दाखवायचा प्रयत्न करतात. त्यामुळे शत्रूंवर कशी मात करावी हे चाणक्यांनी सोप्या भाषेत सांगितले आहे. चला पाहूया ते नियम नेमके काय आहेत.

 

शत्रूला कमी समजू नये-

चाणक्य नीतीनुसार, कधीकधी लोक आपल्या यशात इतके गर्विष्ठ होतात, कि त्यांना शत्रूसुद्धा कमी वाटू लागतो. यशामध्ये लोक शत्रूकडे दुर्लक्ष करतात. परंतु असे करणे अत्यंत चुकीचे असते. कारण अशावेळी शत्रू तुम्हाला पराभूत करण्यासाठी नवनवीन योजना आखत असतो. अशावेळी तुम्ही दुर्लक्ष केल्यास तुम्हाला पराभूत करणे शत्रूला सोपे जाते.

 

रागावर नियंत्रण ठेवा-

आचार्य चाणक्यांनुसार रागावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे. कारण राग तुमच्यातील सामंजस्य आणि बुद्धी चातुर्य कमी करते. त्यामुळे तुम्ही रागात नको त्या गोष्टी करून बसता. अशावेळी शत्रूला त्याचा फायदा होतो. त्यामुळे तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागतो. तसेच रागामध्ये शत्रू तुम्हाला फसवून आपल्या योजना यशस्वी करू शकतो. त्यामुळे शत्रूचा पराभव करताना नेहमीच राग नियंत्रणात ठेऊन विचार करावा.

 

धीर ठेवा-

चाणक्य नीतीनुसार, तुम्ही शत्रूला न घाबरता त्याचा सामना केला पाहिजे. कारण शत्रूला घाबरल्यास त्याला मात देणे कठीण होते. त्यामुळे शत्रूच्या कोणत्याही योजनेला न घाबरता तोंड द्या. असे केल्यानं तुमच्यात आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्याकडून चुका होणार नाहीत. अशाने शत्रूसुद्धा डगमगेल आणि तुम्हाला हे युद्ध जिंकणे सोपे होईल.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)