पंढरपूर – आषाढी एकादशीसाठी लाखो वैष्णवांचा मेळा पंढरपुरात चंद्रभागेच्या तिरावर पोहचला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगदगुरु तुकाराम महाराजांसह अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर पोहचलेल्या आहेत. प्रत्येक वारकऱ्याला आता आस लागली आहे ती विठुरायाच्या दर्शनाची. युगानयुगे कर कटावरी ठेवून चंद्रभागेच्या तिरावर विटेवर उभ्या असलेल्या विठुरायाचं ध्यान डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक वारकरी आता करणार आहे.
विठुरायाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं की देहभान हरपतं असा सगळ्यांचा अनुभव आहे. विठुरायाच्या दर्शनानं अवर्णवीय आनंद आणि शांतता अनुभवायला मिळते, असं प्रत्येक वारकरी सांगतो. विठुरायाच्या या मूर्तीचं हे वेगळेपण कशामुळे आहे तर मूर्तीच्या योगमुद्रेमुळे असल्याचं अभ्यासक सांगतायेत.
कशी आहे सावळ्या विठुरायाची मूर्ती?
विठुरायाची मूर्ती ही योगमुद्रेत साकारलेली आहे. पांडुरंगाच्या चेहऱ्यावर सात्विक भाव आहेत. मूर्ती सरळ आणि ताठ उभी आहे. मूर्तीच्या डाव्या हातात शंख आणि उजव्या हातात कमळ आहे. हे योगाचं लक्षण मानलं जातं. विठुरायाची दृष्टी चरणावर खिळलेली आहे. या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर भाविक निर्विचार आणि निर्विकल्प समाधीत जातो. विठुरायाची मूर्ती पाहिली की अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूचा बांध मोकळा होतो. काही मागायचं हे भानच भाविकांना उरत नाही. विठुरायाच्या दर्शनानं सात्विक आणि शांत भाव निर्माण होतो.
योगमूर्तीची काय वैशिष्ट्य?
दुसऱ्या शतकापासून भारतात मूर्तीकला जोपासण्यात आलेली आहे. यात मूर्तीकलेचे प्रमुख चार प्रकार आहे. त्यात योगमूर्ती, वीरमूर्ती, भोगमूर्ती आणि अभिचारकमूर्ती असे चार प्रकार आहेत.
1. योगमूर्ती- ही मूर्ती अत्यंत दुर्मिळ मानण्यात येते. पंढरपूरच्या विठुरायाची मूर्ती योगमूर्ती आहे. अशा मूर्तीच्या दर्शनानं भाविकाची योगवृत्ती जागृत होते. चित्त निर्विकार होते.
2. भोगमूर्ती- या मूर्तीचा हात आशीर्वाद किंवा अभयमुद्रेचा असतो. वरदमुद्रेत ही मूर्ती दान देणारी असते. अशा मूर्तीसमोर भाविक त्याच्या मनातील इच्छा व्यक्त करतात. तिरुपती बालाजी मंदिरातील मूर्ती ही या अवस्थेतील असल्याचं अभ्यासक सांगतात.
3. वीरमूर्ती- या मूर्तीसमोर उभं राहिल्यानंतर वीररस अनुभवता येतो. मारुती, महिषासूरमर्दिनी अशा मूर्ती या मूर्तीकलेचं उदाहरण आहे. शौर्याच्या उपासनेसाठी अशा मूर्तींची स्थापना करण्यात येते.
4. अभिचारकमूर्ती- तंत्रमंत्राची उपासना करण्यासाठी या मूर्ती घडवल्या जातात. या मूर्तीही दुर्मिळ असतात. गणपती, देवीच्या मूर्ती अशा स्वरुपात सापडतात.





