यंदाची दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे आता सर्वत्र दिवाळीच्या सजावटीची, फराळाची, साफसफाईची तयारी सुरु झाली आहे. या सणात बनवल्या जाणाऱ्या पारंपरीक खाद्यपदार्थांपैकीच एक म्हणजे अनारसे. महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीत याला फार महत्त्व आहे. सणासुदीला किंवा महत्त्वाच्या प्रसंगी घरात अनारसे बनवले जातात. हा एक गोडाचा पदार्थ आहे. पण हा पदार्थ सर्वांना जमतोच असं नाही. याची पारंपरिक रेसिपी जाणून घ्या….
साहित्य
तांदूळ
दही
खसखशीत
पिठीसाखर
देशी तूप
कृती
प्रथम तांदूळ दोन ते तीन दिवस पाण्यात (किमान ४८ तास) भिजत ठेवावे. अनारसेसाठी लहान आकाराचे आणि नवीन तांदूळ वापरणे चांगले. तांदूळ भिजवताना दर २४ तासांनी पाणी बदलावे. ठरलेल्या वेळेनंतर तांदूळातील पाणी काढून टाकावे आणि भिजवलेले तांदूळ जाड कापडावर पसरून सुकण्यासाठी सावलीतच ठेवावे.
जेव्हा तांदळातील बऱ्यापैकी पाणी सुकते, तेव्हा तांदूळ मिक्सरच्या साहाय्याने भरड प्रकारात बारीक करा आणि एका भांड्यात काढा. यानंतर, हे पीठ चाळणीतून चाळून घ्या आणि एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवा. आता पिठात पिठीसाखर आणि थोडं तूप घालून नीट मिक्स करा. आता दही घालून त्याच्या मदतीने पीठ घट्ट मळून घ्या. यानंतर, पीठ १० ते १२ तास झाकून बाजूला ठेवा. ठरलेल्या वेळेनंतर पीठ घेऊन परत एकदा मळून सैलसर करून घ्या. यानंतर पिठाचे छोटे गोळे करून खसखशीत बुडवून घ्या. जेव्हा खसखस कणकेभोवती चांगले चिकटेल तेव्हा ते आपल्या तळहातामध्ये दाबा आणि सपाट करा. त्याचप्रमाणे सर्व गोळ्यांपासून अनारसे बनवा. यानंतर एका पातेल्यात देशी तूप टाकून मध्यम आचेवर गरम करा.
तूप गरम होऊन वितळल्यावर त्यात अनारसे टाका आणि अनारसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. यानंतर अनारसे एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा. त्याचप्रमाणे सर्व अनारसे तळून घ्या. आता अनारसे थंड होऊ द्या. चविष्ट अनारसे तयार आहेत. त्यांना हवाबंद डब्यात घालून ठेवा.
टीप
- अनारसे बिघडू नये म्हणून तांदळाचे प्रमाण आणि गूळ यांचे अचूक प्रमाण वापरणे महत्त्वाचे आहे.
- पाणी जास्त न घालता पीठ मळणे महत्त्वाचे आहे.
-
जर पीठ पातळ झाले तर, त्यात थोडे तांदळाचे पीठ मिसळून घट्ट करता येते.
- अनारसे तळताना मंद आचेवर तळा, जेणेकरून ते आतूनही शिजतील.





