दिवाळी अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे, दिवाळी म्हंटलं पहिली आठवणारी गोष्ट म्हणजे फराळ. फराळाशिवाय दिवाळी होऊच शकत नाही. घराघरांमध्ये आता दिवाळीच्या फराळाची लगबग सुरु झाली आहे. आज आम्हीही तुमच्यासाठी एक फराळाचा खास पदार्थ घेऊन आलो आहोत. चला तर आज जाणून घेऊयात खुसखुशीत शंकरपाळ्या रेसिपी…
साहित्य
- २ कप मैदा
- १/३ कप पाणी
- १/३कप तूप
- १/२ कप पिठीसाखर
- १ कप दूध
- तळण्यासाठी तेल
कृती
- एका भांड्यात पिठीसाखर, तूप आणि दूध घ्या. हे तिन्ही जिन्नस एकत्र करून मिक्स करून घ्या.
- आता तयार केलेले हे मिश्रण गॅसवर मंद आंचेवर ठेवावे. साखर वितळण्याची वाट पाहावी.
- यादरम्यान मिश्रणाला उकळी अजिबात येऊ देऊ नये. त्यासाठी सतत चमच्याने हलवत राहावे.
- आता या मिश्रणात आपण घेतलेला मैदा घालावा.
- मैदा घालून हे पीठ चांगले मळून घ्यावे. लक्षात ठेवा मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त सैल होता कामा नये.
- पिठाचे हे मिश्रण कमीत कमी एक तासभर भिजत ठेवावे.
- आता एक तासानंतर या मिश्रणातून छोटे गोळे घेऊन चपाती सारखे लाटून घ्यावे.
- आता या चपातीला आडवे-तिडवे काप देऊन सुंदर अशा शंकरपाळ्या बनवून घ्याव्या.
- आपल्या आवडीनुसार तुम्ही जाड आणि पातळ काप करू शकता.
- आता एका खोलगट कढईत तेल किंवा तूप गरम करून घ्यावे. परंतु तेल जास्त कडकडीत गरम होणार नाही याची काळजी घ्यावी.
- नाहीतर शंकरपाळ्या करपून जातील.
- या तेलात हळुवार चारी बाजुंनी भाजून घेऊन एका परातीत टिश्यू पेपरवर काढून घ्याव्या.
- अशाप्रकारे तुमच्या खुसखुशीत शंकरपाळ्या तयार आहेत.





