दरवर्षी आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीला यमदीप प्रज्वलित केला जातो. हा एकमेव विशेष दिवस आहे जेव्हा यमराजाची पूजा केली जाते. यमदीपदान का करतात? यमदीपदानाच महत्व आणि कथा जाणून घ्या…

धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमदीपदान करण्याची परंपरा

प्रदोषकाळात यमदीप दान करण्याची परंपरा आहे. दिवा तयार करण्यासाठी गव्हाच्या पिठात हळद घालून पिठ मळून घ्या. नंतर त्याचा दिवा बनवावा. काही ठिकाणी चारमुखी दिवा बनवला जातो. त्यानंतर स्वच्छ कापूस घेऊन दोन लांब वाती करा. त्यांना दिव्यामध्ये एकमेकांच्या आडव्या दिशेने अशा प्रकारं ठेवा की वातीची चार टोकं दिव्याच्या बाहेर आपणास दिसतील. आता त्यात तिळाचं तेल टाका. कुंकू, अक्षत आणि फुलांनी दिव्याची पूजा करा. यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर तांदूळ किंवा गव्हावर दक्षिण दिशेला हा यमाच्या नावाने दीवा लावा. यानंतर ॐ यमदेवाय नमः जप करताना दक्षिण दिशेला नमस्कार करावा.

काय आहे पुराणातील कथा ?

एका प्रचलित कथेनुसार, एका राजकुमाराला त्याच्या जन्मापासूनच अकाली मृत्यूचा शाप होता. त्याच्या लग्नाच्या चौथ्या दिवशी त्याचा मृत्यू होणार होता, म्हणून त्याची पत्नी त्याच्यापासून दूर राहिली. परंतु, एका कथेनुसार, तिच्या कल्पकतेमुळे राजकुमार वाचला. जेव्हा यमदूत राजकुमारचा जीव घेण्यासाठी आले, तेव्हा त्याची पत्नी त्यांच्या मार्गात सोने आणि चांदीचे दागिने टाकून बसली. या दागिन्यांच्या चकाकीने यमदूत गोंधळून गेले आणि त्यांचा मार्ग अडकला. त्यामुळे त्यांना राजकुमारचा जीव घेता आला नाही आणि यमदूत परत फिरले. या घटनेमुळे यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी असा वर दिला की, जो कोणी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला यमासाठी दिवा लावेल, त्याचा अपमृत्यू टळेल. म्हणूनच, धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दक्षिण दिशेला यमदीप लावला जातो. या दिव्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेला ठेवले जाते. हा दिवा लावल्यानंतर यमराजाला नमस्कार करून अपमृत्यूपासून बचाव करण्यासाठी प्रार्थना केली जाते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)