BhauBeej 2025 : भाऊबीजेच्या प्रथा कशी सुरु झाली? काय आहे पौराणिक कथा जाणून घ्या…

Published:
भाऊबीजेची प्रथा पौराणिक कथेनुसार भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी यमराज आणि त्यांची बहीण यमुना यांनी यम-यमीच्या कथेमुळे हा सण साजरा करण्यास सुरुवात केली.
BhauBeej 2025 : भाऊबीजेच्या प्रथा कशी सुरु झाली? काय आहे पौराणिक कथा जाणून घ्या…

दिवाळीचे पाचही दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे. दिवाळीच्या पाचव्या दिवशी भाऊबीज असते. बहीण भावाच्या नात्याचे बंध जोपासणारा असा हा सण. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. या खास दिवशी बहिण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि त्याला ओवाळते तर भाऊ बहिणीला आशीर्वाद आणि प्रेम म्हणून छान भेटवस्तू देतो.

भाऊबीजेच्या प्रथा कशी सुरु झाली काय आहे पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, सूर्यदेवाची पत्नी संग्या हिला दोन मुले होती. मुलगा यमराज आणि मुलगी यमुना. बहीण यमुना आपले भाऊ यमराजावर खूप प्रेम करत असे आणि त्याला आपल्या घरी येण्याची विनंती करत असे, परंतु आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे यमराज आपल्या बहिणीच्या घरी जाऊ शकले नाहीत. एकदा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला यमराज बहीण यमुनेच्या आमंत्रणावरून तिच्या घरी पोहोचले. बहिणीच्या घरी गेल्याच्या आनंदात यमराजांनी नरकवासीयांना एक दिवसासाठी मुक्त केले.

यमराज घरी पोहोचल्यावर यमुनेने आपल्या भावाचे मोठ्या आदराने स्वागत केले आणि त्याच्या स्वागतासाठी विविध पदार्थ तयार केले आणि यमराजाला  औक्षवण केले. जेव्हा यमराज यमुनेच्या घरातून निघू लागले तेव्हा त्यांनी बहिणीला तिच्या पसंतीचा वर मागायला सांगितले. आपल्या आवडीचा वर मागण्याऐवजी बहीण यमुना यमराजाला म्हणाली, “भाऊ, मला वचन दे की तू दरवर्षी माझ्या घरी येशील.” यमराजाने आपल्या बहिणीला हे वचन दिले होते, त्यानंतर भाऊबीज पारंपारिकपणे साजरी केली जाते.

भाऊबीजेचे महत्त्व

भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि आपुलकी दर्शवणारा एक महत्त्वाचा सण आहे. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला औक्षण करते, ज्यामुळे भावाचे आयुष्य वाढते अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी बहिणीकडून भावाला नारळ देण्याचीही प्रथा आहे, जी त्यांच्या नात्यातील प्रेम आणि स्नेह टिकवून ठेवते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)