दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा दिवस. हिंदू पंचांगानुसार, दसऱ्याच्या दिवशी खरेदी आणि शुभ कार्यासाठी कोणते मुहूर्त विशेष फलदायी आहेत, तसेच त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे, याबाबत जाणून घेऊया…
दसऱ्याला नवीन वस्तू खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त
२ ऑक्टोबर रोजी सोने किंवा कोणत्याची वस्तूची खरेदी करण्यासाठी सकाळी ०६ वाजून ३० मिनिटांपासून सकाळी ८ वाजेपर्यंत पहिला शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत दुसरा शुभ मुहूर्त आहे. तसेच संध्याकाळी ५ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत तिसरा शुभ मुहूर्त आहे.
दसऱ्याला सोने का खरेदी करावे?
विजयादशमी म्हणजेच दसरा हा एक शुभ दिवस आहे, ज्याला नवीन गोष्टी खरेदी करण्यासाठी उत्तम मानले जाते. दसऱ्याला सोने खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते, कारण असे केल्याने वर्षभर घरात सुख-समृद्धी येते आणि धन-संपत्तीत वाढ होते. दसऱ्याला “साडेतीन मुहूर्तांपैकी” एक मानले जाते, त्यामुळे या दिवशी सोने, चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर केलेले नवीन काम किंवा खरेदी दीर्घकाळासाठी यशदायी ठरते असे मानले जाते. सोने आणि चांदी व्यतिरिक्त, वाहने, घर किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदीसाठीही हा दिवस चांगला मानला जातो.






