Marathi News

Jyeshtha Gauri Pujan 2025: गौराईसाठी बनवा ज्वारीच्या आंबीलचा नैवेद्य, पाहा पारंपरिक रेसिपी

Published:
गौराई घरात येताच तिचे माहेरपण केले जाते. या तीन दिवसांत देवी गौराईच्या साजश्रुंगारापासून ते पंचपक्वांनापर्यंत आनंदाने आणि भक्तिभावाने सेवा केली जाते.
Jyeshtha Gauri Pujan 2025: गौराईसाठी बनवा ज्वारीच्या आंबीलचा नैवेद्य, पाहा पारंपरिक रेसिपी

Naivedya for Gaurai:   गणरायाच्या आगमनानंतर आता महिलांना देवी गौराईच्या आगमनाचे वेध लागले आहेत. महिलांना गौराई घरी घेऊन येण्याची आतुरता लागून आहे. धार्मिक मान्यतेनुसार, तीन दिवसांसाठी गौराई माहेरी येते अशी परंपरा आहे. महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात वेगवेगळ्या स्वरूपात गौराईची स्थापना केली जाते. कोणाच्या घरी खड्यांच्या गौराई असतात, तर कोणाच्या घरी फुलांच्या गौराई असतात, कोणाकडे ज्येष्ठा-कनिष्ठा अशा दोन गौराई असतात तर कोणाच्या घरी एकच गौराईची स्थापना केली जाते.

गौराई घरात येताच तिचे माहेरपण केले जाते. या तीन दिवसांत देवी गौराईच्या साजश्रुंगारापासून ते पंचपक्वांनापर्यंत आनंदाने आणि भक्तिभावाने सेवा केली जाते. गौरी आवाहनापासून गौराई विसर्जनापर्यंत देवीच्या आवडीचे नैवेद्य बनवले जातात. यामध्ये सर्व पारंपरिक पदार्थांचा समावेश असतो. भाजी-भाकरीपासून ते पुरण पोळीपर्यंत सर्व पदार्थ बनवले जातात.

गौराईच्या महाप्रसादात आंबील आवर्जून बनवली जाते. देवीला अंबिलाचा नैवेद्य दाखवला जातो. यामध्ये ज्वारीची आंबील बनवली जाते. हा एक महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण अनेकांना आंबील बनवता येत नाही. त्यामुळे आज आपण आंबील कसे बनवायचे याची पारंपरिक रेसिपी जाणून घेऊया….

 

ज्वारीची आंबील बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

 

ज्वारीचे पीठ- ४ ते ५ चमचे

दही- ५ चमचे

शेंगदाणे- २ चमचे

खोबऱ्याचे काप- ४-५

हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या

कढीपत्ता

मोहरी

तीळ

हिंग

पाणी

मीठ चवीनुसार

 

ज्वारीची आंबील बनवण्याची पारंपरिक रेसिपी-

 

आंबील करण्यासाठी सर्वात आधी ज्वारीच्या पिठात पाणी घालून रात्रभर भिजत ठेवावे.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच आंबील बनवताना त्यामध्ये दही घालून चांगले मिसळून घ्यावे.

आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, हिंग, खोबऱ्याचे तुकडे, हिरवी मिरची आणि तीळ घालावी.

हे सर्व पदार्थ तेलात चांगले भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून चांगली उकळी काढून घ्यावी.

पाण्याला उकळी आल्यांनतर त्यामध्ये ज्वारीच्या पिठाचे मिश्रण हळूहळू ओतून घ्यावे. पण गुठळ्या होऊ नयेत म्हणून ते सतत ढवळत राहावे.

आता या मिश्रणात मीठ घालून आणखी काही मिनिटे शिजवून घ्यावे. अशाप्रकारे नैवेद्याची आंबील तयार आहे.

 

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews