Rules for planting Tulsi plant: हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. दररोज तुळशीची भक्तिभावाने पूजा केली जाते. तुळशीमुळे घरातील वातावरण अगदी प्रसन्न होते. धार्मिक मान्यतेनुसार दररोज तुळशीची पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि देवीची कृपादृष्टी लाभते. परंतु तुळशीबाबत काही नियम आहेत. ते पाळणे आवश्यक असते.
हिंदू धर्मात वास्तु शास्त्रात प्रत्येक गोष्टीबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास वास्तु दोष होत नसल्याची मान्यता आहे. त्यामुळेच तुळशीचे रोप लावण्याबाबतही वास्तू शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमानुसार तुळशीचे रोप लावल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यामुळे सुखसमृद्धी येते. ते नियम नेमके काय आहेत ते जाणून घेऊया….
तुळशीचे रोप कोणत्या दिशेला लावावे?
वास्तु शास्त्रामध्ये तुळशीचे रोप लावण्याची योग्य दिशा सांगण्यात आली आहे. योग्य दिशेत तुळशीचे रोप लावल्याने घरात सुखसमृद्धी येते असे म्हटले जाते. वास्तु शास्त्रानुसार, घरात उत्तर किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावणे अत्यंत चांगले असते. असे केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते.
तुळशीचे रोप कोणत्या दिवशी लावावे?
वास्तु शास्त्रानुसार, गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी तुळशीचे रोप लावणे एकदम चांगले असते. महिन्याबाबत सांगायचे झाले तर कार्तिक आणि चैत्र महिन्यात तुळशीचे रोप लावणे उत्तम असते. तुळशीचे नियम पाळून तुळशी लावल्याने धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होऊन धनलाभ होतो.
स्वच्छता ठेवा-
वास्तु शास्त्रानुसार, ज्याठिकाणी तुळशीचे रोप लावत आहात त्याठिकाणी स्वच्छता करणे आवश्यक आहे. तुळशी जवळ नेहमीच स्वच्छता असायला हवी. तसेच तुळशीजवळ कोणतेही उष्टी भांडी ठेऊ नयेत.
तुळशीबाबत काही नियम-
दररोज दीप प्रज्वलित करून तुळशीची भक्तिभावाने पूजा करावी. नैवेद्यात तुळशीची पाने वापरावी. परंतु एकादशी आणि रविवारी तुळशीला जल अपूर्ण करू नये. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने एकादशी मातेचे व्रत मोडते. त्यामुळे यादिवशी जल अर्पित करू नये आणि पानेही तोडू नयेत.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






