उत्तराखंड राज्यातील मंदाकिनी नदीच्या काठावर असलेले आणि जगातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी लोकप्रिय अशा केदारनाथ मंदिरात जाणाऱ्या भाविकांना मोठा धक्का बसला आहे. उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाने (UCADA) हेलिकॉप्टर भाड्यात ४९ टक्के वाढ केली आहे (Kedarnath Helicopter Price Hike). या दरवाढीमुळे केदारनाथला जाणाऱ्या भाविकांना अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. हेलिकॉप्टर चे नवीन दर १५ सप्टेंबरपासून लागू होतील.
नव्या दरानुसार किती रुपये भाडे? Kedarnath Helicopter Price Hike
नवीन भाडे दरांनुसार, गुप्तकाशीहून केदारनाथला जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी १२,४४४ रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये फाटाहून ८,९०० रुपये आणि सिरसीहून ८,५०० रुपये भाडे असेल. यापूर्वी, गुप्तकाशीहून सुमारे ८,५०० रुपये आणि फाटा आणि सिरसीहून सुमारे ६,५०० रुपयांना प्रवासी तिकिटे मिळत होती. म्हणजेच आधीच्या तुलनेत भाविकांना चार ते पाच हजार रुपये जास्तीचे मोजावे लागते. आधीच देशात महागाई असताना आता या महागाईचा फटका केदारनाथला जाणाऱ्या भाविकांनाही सोसावा लागणार आहे.
हेलिकॉप्टर सेवा का महागली??
अचानक पणे हेलिकॉप्टर चे तिकीट दर वाढवण्यामागचं कारण सांगताना यूसीएडीएचे सीईओ आशिष चौहान यांनी सांगितलं की, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून, यावेळी हेलिकॉप्टर सेवांमध्ये तांत्रिक सुधारणा केल्या जात आहेत. चारही धाममध्ये ऑटोमॅटिक हवामान केंद्रे बसवली जातील, ज्यामुळे हवामानाची अचूक आणि रिअल टाइम माहिती मिळेल. याशिवाय, पीटीझेड कॅमेरे, एटीसी, व्हीएचएफ सेट आणि सिलोमीटर बसवले जातील. याशिवाय डेहराडूनच्या सहस्त्रधारात आणि सिरसीमध्ये दोन नियंत्रण कक्ष देखील बांधले जात आहेत. तसेच जमिनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी २२ ऑपरेटर्सची टीम तैनात केली जाईल, जेणेकरून उड्डाणांवर सतत लक्ष ठेवता येईल. Kedarnath Helicopter Price Hike
खरं तर, अलिकडच्या काळात बद्रीनाथ आणि गंगोत्री मार्गावर झालेल्या हेलिकॉप्टर अपघातांनंतर, डीजीसीएने राज्य सरकारला सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर गृह सचिव शैलेश बागौली यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती, ज्याने हेली सेवांच्या सुरक्षिततेबाबत अनेक शिफारसी दिल्या होत्या. त्या शिफारसींच्या आधारे नवीन व्यवस्था अंमलात आणल्या जात आहेत.
दरम्यान दरवर्षी, केदारनाथ यात्रेदरम्यान लाखो भाविक हेलिकॉप्टर सेवेचा वापर करतात. अनेक यात्रेकरू वृद्ध आणि आजारी असतात, ज्यांच्यासाठी ही सुविधा सर्वात उत्तम ठरते. मात्र आता हीच हेलिकॉप्टर सेवा महाग झाल्याने केदारनाथला जाणाऱ्या भाविकांना मोठा आर्थिक झटका बसला आहे.





