आज लक्ष्मी पूजन निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या वतीने मंदिरात व मंदिरावर लक्ष्मीपूजनानिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल, रुक्मिणीचं साजिरं रुप डोळ्यात साठवण्याजोगं झालं आहे. या सजावटी मुळे संपूर्ण मंदिर परिसराला एक नवी लकाकी आली आहे. या सजावटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कशी आहे सजावट
सदर सजावट श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त अर्जुन हनुमान पिंगळे (रा. बीड) यांच्या मार्फत करण्यात आली आहे. या सजावटीसाठी सुमारे १५०० ते २००० किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये कोंडा, शेवंती, अष्टर, गुलाब, ऑर्किड, अँथोनीयम, जिप्स, सायकस, गुलछडी, इत्यादी फुलांचा समावेश आहे. या सर्व फुलांच्या माध्यमातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा परिसर रंग, सुगंध आणि भक्तीभावाने उजळून निघाला आहे.
या सजावटीत वैभव, भक्ती आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम साधण्यात आला आहे. या फुलांचा सुगंध दरवळत असल्याने आणि ही सजावट पाहून दर्शनासाठी आलेले भाविक खूपच खुश झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पारंपारिक आणि आधुनिक फुलांच्या रचना यांचा सुंदर संगम भाविकांना एक अद्भुत दृश्यानुभूती देत आहे.
लक्ष्मीपूजन करण्यासाठी अडीच तासाचा वेळ : Laxmi Pujan 2025
अमावस्या तिथी 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.44 वाजता सुरू होणार असून 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 5.54 वाजता तिथी संपणार आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करणं योग्य आहे. यादिवशी सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी 6.10 वाजेपासून ते रात्री 8.40 वाजेदरम्यान लक्ष्मीपूजन करू शकता. यंदा लक्ष्मीपूजन करण्यासाठी जवळपास अडीच तासाचा वेळ आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






