Navratri Vastu Tips In Marathi: देशभरात नवरात्रोत्सवाची आतुरता लागून आहे. सर्वत्रच नवरात्रीची जोरदार तयारी सुरु आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. हिंदू पंचांगानुसार नवरात्री हा सण आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथपर्यंत साजरा केला जातो.
नवरात्री वास्तु उपाय-
नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. भक्त अगदी भक्तिभावाने देवीची पूजा करतात. तसेच देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नऊ दिवस उपवासदेखील करतात. तसेच वास्तु शास्त्रामध्ये नवरात्रीमध्ये काही वास्तु उपाय करण्याचा सल्लादेखील देण्यात आला आहे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येऊन देवी प्रसन्न होते अशी मान्यता आहे. या उपायानुसार घरात काही वस्तू आणण्याचा सल्ला दिला जातो. पाहूया हे उपाय नेमके काय आहेत….
नवरात्रीमध्ये घरी आणा ‘या’ वस्तू-
त्रिशूल-
वास्तु शास्त्रानुसार, तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील, घरात सतत वादविवाद आणि भांडणे होते असतील किंवा घरात धनधान्याची कमतरता असेल तर नवरात्रीदरम्यान एक छोटा त्रिशूल घरी घेऊन या. दुसऱ्या दिवशी अंघोळ करून पूजा करून ते पूजेच्या ठिकाणी ठेवा. आणि त्याची पूजा करा. त्याला तुम्ही लाल रंगाची ओढणीसुद्धा बांधू शकता. पूजेनंतर हे त्रिशूल घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेऊन द्या. असे केल्याने नकारात्मकता दूर होऊन सुखसमृद्धी येईल.
शंख-
तुमच्याही घरात सतत आपापसांत मतभेद आणि वादविवाद होत असतील तर वास्तु शास्त्रानुसार नवरात्रीदरम्यान घरात एक शंख घेऊन या. देवी दुर्गा मातेच्या हातात शंख आहे. त्यामुळे शंख घरी आणल्यास सुखसमृद्धी लाभते. अडचणी दूर होऊन नवचैतन्य निर्माण होते.
दुर्गा मातेची चांदीची प्रतिमा-
वास्तु शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची चांदीची प्रतिमा घरी घेऊन या. दुसऱ्या दिवशी अंघोळ करून पूजा केल्यानंतर प्रतिमेची स्थापना करा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सकारात्मकता आणि सुखसमृद्धी येते.
डमरू-
वास्तु शास्त्रानुसार नवरात्रीदरम्यान घरात डमरू आणणे अत्यंत चांगले असते. डमरू आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी अंघोळ करून पूजा करून डमरू स्थापित करा. हवे असल्यास तुम्ही त्रिशूलसोबत डमरू बांधू शकता. शिवाय पूजेनंतर डमरू वाजवून घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. शिवाय घरात सुखसमृद्धी येते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





