Kojagiri Purnima 2025 : यंदाच्या कोजागिरीला फक्त मसाला दूधच नाही खीरही बनवा, पाहा खास रेसिपी!

Published:
कोजागिरी पौर्णिमेला उगवणारा चंद्र स्पेशल असतो. त्यामुळे त्यादिवशी केवळ दुध नाही तर काही स्पेशल खीर हि बनवल्या जातात.
Kojagiri Purnima 2025 : यंदाच्या कोजागिरीला फक्त मसाला दूधच नाही खीरही बनवा, पाहा खास रेसिपी!

कोजागिरी पौर्णिमा आपल्या आयुष्यात आनंद आणि चैतन्य घेऊन येते. चंद्राच्या मंद प्रकाशात, आप्तजनांसोबत गप्पा कारण, मजामस्ती करणं, नाच गाणं करत आनंद साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमेला गोड पदार्थांमध्ये खीर आणि मसाला दूध करण्याची प्रथा आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी हे पदार्थ अमृत प्रसाद बनते. आज आम्ही तुम्हाला खीर बनवण्याच्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात खीर बनवण्याची सोपी रेसिपी….

साबुदाणा खीर

साहित्य 

  • १ कप साबुदाणा
  • ३-४ कप दूध
  • १/२ कप साखर
  • १/२ चमचा वेलची पूड
  • सुकामेवा (बदाम, काजू, मनुका)

कृती

  • साबुदाणा स्वच्छ धुवा आणि तो पूर्णपणे बुडेल इतके पाणी घालून रात्रभर किंवा कमीतकमी ४-६ तास भिजत ठेवा.
  • एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध घ्या आणि ते उकळण्यासाठी ठेवा.
  • दुधाला उकळी आल्यावर त्यात भिजवलेला साबुदाणा घाला. मंद आचेवर साबुदाणा शिजायला लागेल आणि दूध घट्ट व्हायला लागेल. साबुदाणा पारदर्शक आणि मऊ होईपर्यंत शिजवा.
  • खीर शिजत असताना त्यात साखर घाला आणि ती पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहा.
  • साखर विरघळल्यावर त्यात वेलची पूड घाला आणि चांगले मिक्स करा.
  • आवडीनुसार चिरलेले बदाम, काजू किंवा मनुका घाला.
  • तुमची कोजागिरी पौर्णिमेसाठीची साबुदाणा खीर तयार आहे. ती कोमट किंवा थंड करून सर्व्ह करा. 

दूध पोहे खीर

साहित्य

  • २ ग्लास दूध
  • १/२ वाटी जाड पोहे
  • चवीनुसार साखर
  • वेलची पूड
  • सुकामेवा (बदाम, काजू इ.) आवडीनुसार

कृती

  • एका जाड बुडाच्या भांड्यात दूध उकळायला ठेवा.
  • दूध उकळल्यानंतर त्यात जाड पोहे घाला.
  • पोहे दुधात चांगले मऊ होईपर्यंत शिजवा. पोहे शिजल्यावर ते दुधात भिजून जाडसर होतात.
  • नंतर त्यात चवीनुसार साखर घाला आणि चांगले मिसळा.
  • वेलची पूड आणि तुमच्या आवडीचा सुकामेवा घालून खीर चांगली एकजीव होईपर्यंत शिजवा.
  • ही खीर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात बाहेर ठेवा.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा चंद्रप्रकाश पडल्यानंतर ती ग्रहण करावी.

शेवयांची खीर

साहित्य

  • १ कप शेवया (तळलेल्या किंवा भाजलेल्या)
  • १ लिटर दूध
  • १/२ कप साखर (आवडीनुसार)
  • १/४ कप ड्रायफ्रुट्स (बदाम, काजू, पिस्ते)
  • १/४ टीस्पून वेलची पूड
  • चिमूटभर केशर

कृती

  • एका जाड बुडाच्या कढईत थोडं तूप घ्या आणि त्यात शेवया सोनेरी रंगावर भाजून घ्या.
  • एका भांड्यात दूध गरम करून घ्या. दूध फाटणार नाही याची काळजी घ्या.
  • दुधाला एक उकळी आल्यावर त्यात भाजलेल्या शेवया आणि साखर घालून मिक्स करा.
  • खीर मध्यम आचेवर शिजू द्या, जेणेकरून शेवया व्यवस्थित शिजतील आणि खीर थोडी घट्ट होईल.
  • खीर तयार झाल्यावर त्यात ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड घालून मिक्स करा.
  • खीर थंड झाल्यावर एका चांदीच्या किंवा काचेच्या भांड्यात काढून चंद्रप्रकाशात रात्रभर ठेवा, असे केले जाते.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी खीर चंद्रप्रकाशाच्या अमृत गुणधर्मांसह तयार झालेली असते, जी देवाला नैवेद्य म्हणून दाखवून खाऊ शकता. 
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews