नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उत्सव आहे. या नऊ दिवसांत देवी दुर्गेची नऊ रूपे भक्तिभावाने पूजली जातात. नवरात्रीची सुरुवात घटस्थापनापासून होते. घटस्थापना म्हणजे कलश स्थापित करून देवीला आमंत्रित करणे. या कलशात पाणी, नारळ, आंब्याची पाने व सुपारी ठेवून त्यावर लाल वस्त्र बांधले जाते. हा कलश शक्ती, संपत्ती आणि मंगलकारकतेचे प्रतीक मानला जातो.
धार्मिक शास्त्रांनुसार घटस्थापना योग्य मुहूर्तावर केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि समृद्धी लाभते. नवरात्रीत उपवास, जप, पूजन आणि आरती करून देवीची कृपा मिळवली जाते. घटस्थापना ही नवरात्रीतील सर्वात महत्त्वाची धार्मिक प्रक्रिया मानली जाते. याबाबतची शास्त्रोक्त पद्धत आणि विधी जाणून घेऊ…
घटस्थापनेची योग्य पद्धत आणि मुहूर्त
सोमवार, 22 सप्टेंबर 2025 रोजी घटस्थापना केली जाणार आहे. सकाळी6.09 वाजेपासून ते सकाळी 8.06 वाजेपर्यंत मुहूर्त असणार आहे. याबाबत अभिजित मुहूर्त सकाळी 11.49 वाजेपासून ते दुपारी 12.38 वाजेपर्यंत आहे. याकाळात तुम्ही घटस्थापना करू शकता.
सर्वात प्रथम म्हणजे ज्यामध्ये घट बसवायचे आहेत त्यासाठी परडी आणावी. काहीजण मातीच्या भांड्यात घट बसवतात त्यांनी मातीचे भांडे किंवा कलश आणावा. विड्याची पाने, लाल धागा,सात प्रकारचे धान्य,तांदूळ,सुपारी,विडा,पाच फळे,नारळ,तांब्याचा कलश,चौरंग,लाल वस्त्र,फुले,हार,दिवा,अगरबत्ती,धूप,रांगोळी. चौरंगावर नवीन लाल वस्त्र अंथरावे. त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव मांडावे. मग बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशात एक नाणे टाकून त्यावर विड्याच्या पानांमध्ये नारळ ठेवावा. कलशाला हळदकुंकू लावावे. परडीत माती घ्यावी मातीत सात प्रकारची धान्य पेरावीत त्यावर मातीचा कलश ठेवावं कलशात पाणी घालावे त्यात नाणे टाकावे तांदूळ घालावे मग त्यावर विड्याची पाने लावून त्यात नारळ ठेवावा.
नारळाला हळदीकुंकू लावावे. कलशाला लाल धागा बांधावा. लाल धाग्याला विड्याची नऊ पाने लावून माळ तयार करावी व ती घटाला पहिल्या दिवशी बांधावी. हा घट देवी समोर बसवावा. त्यानंतर देवीला हार फुले अर्पण करुन धूप, दीप,अगरबत्ती लावून पूजा करावी. नैवेद्य दाखवून शेवटी देवीची आरती करावी.
घटस्थापनेचा शास्त्रोक्त पूजेचा विधी
घटस्थापनेची शास्त्रोक्त पूजाविधी ही जवळपास सारखीच असते. यंदा नवरात्री २२ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना देखील करण्यात येईल. अनेकांना घटस्थापनेची योग्य पद्धत माहित नसते. घटस्थापनेच्या पूजेत फार कमी साहित्य लागते. प्रत्येकजण आपल्या पद्धतीनुसार हे साहित्य कमी जास्त करू शकते.
हा कलश देवीच्या शक्तीचे, मंगलतेचे व समृद्धीचे प्रतीक मानला जातो. धार्मिक ग्रंथांनुसार घटस्थापना म्हणजे देवीला आपल्या घरात आमंत्रित करण्याची प्रक्रिया होय. या वेळी रोपांपासून नवलाईचे प्रतीक म्हणून ‘जवारे’ पेरले जातात, जे जीवनशक्तीचे द्योतक मानले जाते. घटस्थापना योग्य मुहूर्तावर केल्याने घरात शांती, आनंद व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नवरात्रीत रोज देवीची पूजा व आराधना करून भक्त तिच्या कृपेची याचना करतात. त्यामुळे घटस्थापनेला धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मान्यता आहे.






