Navratri 2025: शारदीय नवरात्रोत्सवाचा सण अतिशय पवित्र सण आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्व आहे. शारदीय नवरात्रोत्सव हा उत्सव देवी दुर्गा मातेला समर्पित आहे. नवरात्रोत्सवाच्या या नऊ दिवसांत देवी आपल्या नऊ रूपांत भक्तांना आशीर्वाद देते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत विविध नियम पाळले जातात. तसेच सुखसमृद्धी आणि देवीचा आशीर्वाद लाभण्यासाठी काही उपायसुद्धा केले जातात.
हिंदू धर्मात वास्तु शास्त्राला विशेष महत्व आहे. वास्तु शास्त्रानुसार नवरात्रीच्या नऊ दिवसांत काही वास्तु उपाय केल्याने देवी दुर्गा माता प्रसन्न होते आणि भक्ताला आशीर्वाद देते. वास्तु शास्त्रानुसार नवरात्रीच्या या उत्सवात काही रोपे लावणे अत्यंत चांगले असते. असे केल्याने देवी दुर्गा मातेचा आशीर्वाद लाभतो आणि घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. पाहूया ही रोपे नेमकी कोणती आहेत.
तुळशी-
तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. तुळशीला देवी लक्ष्मीचे स्वरूप समजले जाते. म्हणूनच नवरात्रीदरम्यान तुळशीचे रोप लावल्यास देवी प्रसन्न होते. तुळशीच्या रोपामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तसेच दररोज सायंकाळी तुळशीजवळ दीप प्रज्वलित केल्याने देवी दुर्गा माता आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो.
केळीचे झाड-
केळीचे झाड भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. नवरात्रीमध्ये घराजवळ केळीचे झाड लावल्याने सुखसमृद्धी लाभते. घरात धनधान्य येते. तसेच वैवाहिक आयुष्यात सुख-समाधान प्राप्त होते.
शमीचे झाड-
हिंदू धर्मानुसार शमीचे झाड शनिदेवाला समर्पित आहे. तसेच हे झाड देवी दुर्गा माता आणि भगवान शिवलासुद्धा प्रिय आहे. शमीचे झाड लावल्याने शत्रूंवर मात करणे सोपे होते. प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते. तसेच आजूबाजूचे वातावरण सकारात्मक राहते.
जास्वंदचे रोप-
जास्वंदाची फुले देवी दुर्गा मातेला अतिशय प्रिय आहेत. खासकरून लाल जास्वंदाची फुले देवीला अर्पण केल्याने देवी दुर्गा माता प्रसन्न होते. भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते. घरात सुखसमृद्धी येते. नवरात्रीमध्ये जास्वंदाचे रोप लावल्यास कौटुंबिक संबंध चांगले होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





