Wed, Dec 31, 2025

Sai baba Darshan: नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डीत साईभक्तांची गर्दी; दर्शनासाठी रांगा !

Written by:Rohit Shinde
Published:
नवीन वर्षाची सुरूवात होत आहे. अशा परिस्थितीमध्ये शिर्डीत श्री साई बाबांचे दर्शन आणि आशिर्वाद मिळविण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
Sai baba Darshan: नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डीत साईभक्तांची गर्दी; दर्शनासाठी रांगा !

नवीन वर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनानं व्हावी, यासाठी देश-विदेशातील लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेत. या भाविकांना साईबाबांच्या समाधीचं दर्शन मिळावं, यासाठी साईबाबा संस्थानच्या वतीनं साईबाबा मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं आहे. साईबाबा मंदिरासह संपूर्ण परिसराला विद्युत रोषणाईसह विविध फुलांची आकर्षक सजावट केली आहे. खरंतर नवीन वर्षाची सुरूवात होत आहे. अशा परिस्थितीमध्ये शिर्डीत श्री साई बाबांचे दर्शन आणि आशिर्वाद मिळविण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

नवीन वर्षाची सुरूवात साईंच्या आशिर्वादाने !

नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि 2026 च्या स्वागताचा उत्साह यामुळे शिर्डीत सध्या जगभरातून लाखो साईभक्तांची मांदियाळी लोटली आहे. या अथांग गर्दीतही भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी शिर्डी पोलीस प्रशासन आणि साई संस्थानने राबवलेल्या मास्टर प्लॅनमुळे भाविकांचा शिर्डी प्रवास सुखकर होत आहे. प्रशासनाच्या या उत्कृष्ट नियोजनाचे साईभक्तांकडून कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी गर्दी वाढल्यावर खबरदारी म्हणून जनसंपर्क कार्यालय बंद ठेवले जात असे, मात्र यंदा ते सुरू ठेवल्याने भाविकांना माहिती मिळणे सोपे झाले आहे. ठिकठिकाणी बॅरिकेटिंग केल्यामुळे दर्शनाची रांग कोठेही न थांबता सातत्याने प्रवाहित राहत आहे. एकूणच पोलीस प्रशासन आणि साई संस्थान यांच्यातील अचूक समन्वयामुळे शिर्डीत येणार्‍या प्रत्येक साईभक्ताचा दर्शनाचा अनुभव यंदा अधिक सुखद आणि सुरक्षित ठरत आहे.

श्री साईबाबांच्या मंदिराला आकर्षक सजावट

नववर्षानिमित्त साईबाबा संस्थानच्या वतीनं साई मंदिरासह परिसरातील द्वारकामाई, चावडी, गुरुस्थान या मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. त्याचबरोबर साईबाबा मंदिराच्या चार क्रमांक गेटच्या बाहेरील बाजूस एक कमान उभारण्यात आली. कमानीलाही विद्युत रोषणाई केली आहे. नवीन वर्षानिमित्त साईबाबा मंदिरासह परिसर विद्युत रोषणाईनं उजळून निघाला आहे. बंगळुरू येथील देणगीदार साईभक्त बसाराज हे मागील अनेक वर्षांपासून नवीन वर्षानिमित्त साईबाबांच्या मंदिरातील गाभाऱ्यासह परिसराला तसंच द्वारकामाई, चावडी, गुरुस्थान या मंदिरांना विविध देशी-विदेशी फुलांनी सजवत असतात. यंदाच्या वर्षीही त्यांच्या देणगीतून साईबाबा मंदिरासह परिसरातील मंदिरांना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यामुळे भक्तांमधील उत्साह द्विगुणित झाला आहे.