नववधूसाठी मंगळागौर हा अत्यंत खास सण असतो. या दिवशी ती पूजा करते, खेळ खेळते, आपल्या सख्यांना भेटते, नातेवाईक स्त्रियांना भेटते. अशावेळी तिला उखाणा घे, उखाणा घे असा आग्रह हमखास केला जातो. शिवाय या सोहळ्यात जमलेल्या तिच्या सख्याही हौशीने आपल्या नवऱ्याचं नाव उखाण्यातून घेतात. मंगळागौरीनिमित्त तुम्हीसुद्धा खास उखाणे घेऊ शकता.
मंगळागौरीचे महत्त्व
मंगळागौर हे व्रत स्त्रिया विशेषतः नवविवाहित महिलांसाठी महत्वाचे मानले जाते. हे व्रत श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी केले जाते. या व्रतात देवी पार्वतीची (गौरी) पूजा केली जाते. या व्रताचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात. अविवाहित मुली चांगले पती मिळावे यासाठी हे व्रत करतात.
मंगळागौर पूजेसाठी काही दमदार उखाणे
मोत्याचा हार, गौराईच्या गळ्यात,
….रावांचे नाव घेते, सुवासिनीच्या मेळ्यात.
मंगळागौरीला वाढलाय, पावसाचा जोर,
…. रावांचे नाव घेते, माझे भाग्यच थोर.
हिरव्यागार रंगाने, श्रावणात सजली सृष्टी
… रावांच्या नावाने, मी मंगळागौर पुजली.
श्रावण महिन्यात सजला मंगळागौरीचा थाट
…. रावांचं नाव घ्यायला मी कशाला बघू वाट
गौराईचा खेळ बाई, आनंदात नाचू गाऊ
…. रावांचं नाव घ्यायला मी कशाला बाई लाजू.
हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली कळशी
…. रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी.
दारापुढे काढली मी ठिपक्यांची रांगोळी
… रावांचे नाव घेते मी मंगळागौरीच्या पूजेच्या वेळी.
मंगळागौरीचे व्रत करतात, सौभाग्यासाठी,
…. रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वांसाठी.
सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे हिरव्या बांगड्यांचे चुडे
…. रावांचे नाव घेते, मंगळागौरी देवीच्या पुढे.
लग्नानंतर पहिली मंगळागौर साजरी करते माहेरी,
…. रावांचे नाव घेते, नेसून साडी चंदेरी.
पूजेकरिता जमविल्या, नानविध पत्री,
…. रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या रात्री.
आई बाबांनी केले लाड, सासू-सासऱ्यांनी पुरवली हौस
…. रावांचे नाव घेते, आज मंगळागौर खेळण्याची फिटली हौस
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





