श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. हिंदू धर्मात नागपंचमीचं विशेष महत्व सांगण्यात आलं आहे. पौराणिक काळापासून नाग देवतेला पूजनीय मानले जाते. त्यामुळे श्रावणात हा सण साजरा केला जातो. यंदा नागपंचमीचा सण 29 जुलै रोजी साजरा केला जाणार असून याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी अनेक महिला आपल्या भावासाठी उपवास करतात. पण अनेकांना यामागचं कारण माहीत नसतं. असं का केलं जात यामागची कथा काय आहे ते जाणून घेऊयात…
नागपंचमीला भावासाठी उपवास का केला जातो?
नागपंचमीशी संबंधित अनेक कथा आहेत. पौराणिक कथेप्रमाणे सत्येश्वरी नावाची एक कन्या होती. सत्येश्वरीला एक भाऊ होता. सत्येश्वर असे त्याचे नाव होते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्येश्वरचा अकस्मित मृत्यू झाला. भावाच्या विरहामुळे सत्येश्वरी दु:खी होती. तिने अन्नत्याग केला होता. त्याचवेळी तिला सत्येश्वर नागरुपात दिसला. त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला. सत्येश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल, असे नागदेवतेने वचन तिला दिले. तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या आणि उपवास करू लागल्या.
यंदा नागपंचमीचा सण कधी?
पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीची तिथी 28 जुलैला रात्री 11 वाजून 23 मिनिटांनी सुरु होते. तसेच 29 जुलैला रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार नागपंचमी हा सण 29 जुलैला साजला केला जाईल.
नागपंचमीच्या पूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 42 मिनिटांपासून सकाळी 8 वाजून 31 मिनिटांपर्यंत असेल. तसेच दुपारी 3 वाजून 51 मिनिटे ते संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटांपर्यंत असेल.






