सध्या श्रावण महिन्यात अनेकजण मोठ्या श्रद्धने उपवास करतात. अशा वेळी लोक उपवास आणि उपासनेत अधिक व्यस्त असतात. असे बरेच लोक आहेत जे दिवसभर काहीही खात नाहीत आणि काहींना उपवासात फलाहार घेणे आवडते. श्रावण महिन्यात मांसाहार करत नसल्यानं आपण शाकाहारी पदार्थांचे वेगवगळे बेत करतो. शिवाय सणावाराच्या निमित्तानं, श्रावणी सोमवारच्या निमित्तानं नैवेद्याचं ताट सजवायचं असतं. त्यासाठी खास ओल्या नारळाची गोड पुरी कशी बनवायची याची परफेक्ट रेसिपी आज आपण पाहणार आहोत…
साहित्य
- एक वाटी ओल्या नारळाचा चव (किसलेला)
- अर्धी वाटी गूळ (बारीक किसलेला) किंवा साखर
- दोन वाट्या गव्हाचे पीठ
- पाव चमचा वेलची पूड
- चिमूटभर मीठ
- तूप किंवा तेल (पुरी तळण्यासाठी)
कृती
- एका भांड्यात नारळाचा चव, गूळ (किंवा साखर), वेलची पूड आणि मीठ एकत्र करा.
- गव्हाचे पीठ घालून थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या.
- पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या.
- प्रत्येक गोळ्याला पुरीप्रमाणे लाटून घ्या.
- कढईत तेल गरम करून त्यात पुरी मध्यम आचेवर तळून घ्या.
- गरमागरम पुरी नारळाच्या चवीसोबत खूप छान लागते.
टीप
- गूळ आणि नारळाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.
- पुरी तळताना तेल जास्त गरम नसावे, नाहीतर पुरी जळण्याची शक्यता असते.
- पुरी थोडीशी जाडसर लाटल्यास छान खुसखुशीत होते.
- याच पिठात तुम्ही खवा किंवा मावा घालून देखील पुरी बनवू शकता.






