सध्या श्रावण महिन्यात अनेकजण मोठ्या श्रद्धने उपवास करतात. अशा वेळी लोक उपवास आणि उपासनेत अधिक व्यस्त असतात. असे बरेच लोक आहेत जे दिवसभर काहीही खात नाहीत आणि काहींना उपवासात फलाहार घेणे आवडते. श्रावण महिन्यात मांसाहार करत नसल्यानं आपण शाकाहारी पदार्थांचे वेगवगळे बेत करतो. शिवाय सणावाराच्या निमित्तानं, श्रावणी सोमवारच्या निमित्तानं नैवेद्याचं ताट सजवायचं असतं. त्यासाठी खास मालपुवा कसा बनवायचा याची परफेक्ट रेसिपी आज आपण पाहणार आहोत…
साहित्य
- दोन वाट्या गव्हाचे पीठ
- एक वाटी साखर
- पाव वाटी रवा
- वेलची पूड
- दूध (आवश्यकतेनुसार)
- तळण्यासाठी तेल किंवा तूप
कृती
- एका भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, साखर आणि वेलची पूड घ्या.
- दूध थोडे-थोडे घालून मिश्रण चांगले फेटून घ्या. मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे.
- पिठाचे मिश्रण 15-20 मिनिटे बाजूला ठेवा.
- एका कढईमध्ये तेल किंवा तूप गरम करा.
- पिठाच्या मिश्रणातून एक चमचाभर मिश्रण घेऊन गरम तेलात टाका.
- मालपुवा दोन्ही बाजूने सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
- तयार मालपुवा टिश्यू पेपरवर काढा.
- गरमागरम मालपुवा उपवासासाठी किंवा कधीही खाण्यासाठी तयार आहे.
टीप
- तुम्ही पिठाच्या मिश्रणात खवा किंवा मावा देखील घालू शकता.
- जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर साखरेचे प्रमाण वाढवू शकता.
- तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिस्ता किंवा बदामाचे काप देखील घालू शकता.






