Wed, Dec 31, 2025

श्री सिध्दीविनायक मंदिरात भाविकांची गर्दी उसळणार; नवीन वर्षाचं स्वागत बाप्पाच्या दर्शनाने!

Written by:Rohit Shinde
Published:
नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्याची परंपरा अनेक भाविकांमध्ये रुजलेली आहे. यामुळे दरवर्षी 1 जानेवारीला पहाटेपासूनच मुंबईतील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी उसळते.
श्री सिध्दीविनायक मंदिरात भाविकांची गर्दी उसळणार; नवीन वर्षाचं स्वागत बाप्पाच्या दर्शनाने!

मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिर हे भाविकांच्या अपार श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्त येथे येतात. मंगळवार, संकष्टी चतुर्थी, गणेशोत्सव तसेच विशेष सणांच्या काळात मंदिरात प्रचंड गर्दी उसळते. देश-विदेशातील भाविक, सेलिब्रिटी, राजकीय नेतेही दर्शनासाठी येतात. भक्तांच्या सोयीसाठी दर्शनाची योग्य व्यवस्था, सुरक्षा, रांगा, ऑनलाईन दर्शन व देणगी व्यवस्था करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्षाची सुरूवात भक्त श्री सिध्दीविनायकाचे दर्शन घेत करत असतात. बाप्पाचे आशिर्वाद घेवून पुढील वाटचाल केली जाते. अशा परिस्थितीत मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळते, तेव्हा मंदिर ट्रस्टकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

मंदिर प्रशासनाकडून भक्तांसाठी चोख व्यवस्था

नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्याची परंपरा अनेक भाविकांमध्ये रुजलेली आहे. यामुळे दरवर्षी 1 जानेवारीला पहाटेपासूनच मुंबईतील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. यात श्री सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी आणि बाबूलनाथ मंदिरांचा विशेष समावेश असतो. या मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी लाखोंच्या घरात पोहोचते. विशेषतः श्री सिद्धिविनायक मंदिरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लाखो भाविकांच्या गर्दीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला (31 डिसेंबर) आणि पहिल्या दिवशी (1 जानेवारी) मंदिरांमध्ये होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मुंबईतील जवळपास सर्वच मंदिर प्रशासनांकडून योग्यपद्धतीनं पूर्व नियोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील प्रत्येक मंदिरांमध्ये वर्षाच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर गर्दी होणं स्वाभाविक आहे. मात्र, सध्या निवणुकांच्या काळात ही गर्दी दरवर्षीपेक्षा जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वैद्यकीय सुविधा, रांगेत पिण्याचं पाणी, मोबाईल टॉयलेट्स, मंडप अश्या अनेक सुविधाही प्रमुख मंदिरांकडून पुरवण्यात आल्या आहेत.

31 डिसेंबर – 01 जानेवारीचे कसे असेल नियोजन ?

  • विशेष पूजा सेवा बंद : 1 जानेवारीला कोणतीही विशेष पूजा सेवा उपलब्ध राहणार नाही, जेणेकरून दर्शन रांगा सुलभपणे चालतील आणि खोळंबा टाळता येईल.
  • विविध रांगांचं नियोजन: गाभाऱ्यातून सर्वसामान्यांसाठी दर्शनाची रांग, महिलांसाठी स्वतंत्र विशेष रांग, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिलांना आणि नवजात बालकांसह येणाऱ्या भाविकांसाठी खास रांग, मुखदर्शन रांग अशा खास रांगाचं नियोजन करण्यात आलं आहे.
  • प्रतीक्षा व्यवस्था: मंदिराजवळील राजे शहाजी मैदानात मोठा प्रशस्त तंबू उभारण्यात आला आहे, ज्यात एकावेळी सुमारे 10 हजार भाविक थांबू शकतील.
  • दर्शन वेळ: मंदिर पहाटे 3:15 वाजल्यापासून उघडेल आणि रात्री 11:30 पर्यंत सुरू राहील.
  • वाहतूक सुविधा: भाविक मेट्रोनं थेट सिद्धिविनायक मंदिरापर्यंत येऊ शकतात. तसेच, दादर रेल्वे स्टेशन ते मंदिरापर्यंत न्यासाकडून मोफत एसी बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

याशिवाय, 6 जानेवारी 2026 रोजी येणाऱ्या वर्षातील पहिल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानंही भाविकांसाठी विशेष सेवा-सुविधांचं नियोजन करण्यात येत आहे, असं न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी सांगितलं.

  • दर्शन- पहाटे 03:15 ते पहाटे 05:15
  • आरती- पहाटे 05:30 ते सकाळी 6
  • दर्शन- सकाळी 6 ते दुपारी 12
  • नैवैद्य- दुपारी 12 ते दुपारी 12:30
  • दर्शन- दुपारी 12:30 ते सायंकाळी 7
  • धूपारती- सायंकाळी 7 ते सायंकाळी 07:10
  • आरती – सायंकाळी 07:30 ते रात्री 8
  • दर्शन- रात्री 8 ते रात्री 11:30