Marathi News

शिवपूजा करताना बेलाचे पान अत्यंत गरजेचे, बेलाच्या पानांचे महत्व आणि धारणा काय?

Written by:Rohit Shinde
Published:
श्रावण महिन्यात भगवान शिवाची मनोभावे पूजा केली जाते. अशा पूजेच्या वेळी बेलाची पाने भक्तांकडून आवर्जुन वापरली जातात. नेमकी यामागे काय धारणा आहे, ती समजून घेऊ...
शिवपूजा करताना बेलाचे पान अत्यंत गरजेचे, बेलाच्या पानांचे महत्व आणि धारणा काय?

श्रावण महिन्यात भक्तांकडून भगवान शिवाची मनोभावे पूजा केली जाते. अशावेळी बेलाच्या पानांचा वापर होत असतो. श्रावण महिना हा भगवान शिवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. या महिन्यात भक्त मोठ्या श्रद्धेने शिवपूजा करतात. शिवलिंगावर बेलाची पाने अर्पण करणे हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. बेलाच्या पानांना पवित्र मानले गेले असून त्याचे तीन दल त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या बेलाच्या पानांचा वापर नेमका का होतो? त्याचबरोबर त्यामागील अध्यात्मिक धारणा नेमकी काय ते समजून घेऊ…

बेलाची पाने नेमकी का वापरतात?

पुराणकथेनुसार, जेव्हा समुद्र मंथनातून हलाहल विष बाहेर आलं, तेव्हा ते सृष्टीला नष्ट करण्यास पुरेसं होतं. फक्त एकच देव असा होता, ज्याने ते पचवलं महादेव शंकर! शिवांच्या कंठात जळजळीत विष असताना, देवतांनी त्यांना शीतलता देण्यासाठी बेलाची पानं अर्पण केली. तेव्हापासून बेलपान हे शिवपूजेत अनिवार्य झाली अशी आख्यायिका समोर आली. दरम्यान शिवाला जे बेलपत्र अर्पण केले जाते त्या पानात तीन भाग असतात. जे त्रिदेव, त्रिगुण, आणि शिवाचे त्रिनेत्र दर्शवतात म्हणूनच एकच बेलपत्र म्हणजे एक शक्तिशाली अर्पण असेही म्हणाले जाते.

बेलाच्या पानांमागे पौराणिक कथा

म्हणूनच म्हणतात की, शिवाला प्रसन्न करण्यासाठी सोनं नको, पैसे नकोत फक्त हवं शुद्ध मन, आणि एक बेलाचं पान पुरेसं आहे. शिवाला बेलपत्र का वाहतात ? याबद्दलच्या अनेक कथादेखील ऐकायला मिळतात. त्यातील एक कथा आपण जाणून घेऊया. एकदा देव आणि दैत्यांनी मिळून समुद्र मंथन केले. त्या मंथनातून अमृतासोबत एक अत्यंत भयंकर हलाहल विष बाहेर पडलं जे पूर्ण ब्रह्मांड नष्ट करू शकत होतं. सर्व देव घाबरून भगवान शिवांकडे गेले.

शिवांनी संपूर्ण विष पिऊन ते आपल्या कंठात धरलं, त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला म्हणून त्यांना नीलकंठ म्हणतात. या विषामुळे शिवाचा देह प्रचंड उष्ण झाला होता. त्यांना शीतलता देण्यासाठी देवतांनी बेलाच्या झाडाची पानं अर्पण केली. ही पाने अतिशय शीतल असतात. तेव्हापासून बेलपत्र हे शिवपूजेसाठी अत्यावश्यक मानलं जातं. त्यामुळे बेलाच्या पानांमागे साधारण पौराणिक कथा असल्याचे दिसते. यामागे कोणतेही वैद्यकशास्त्र नसल्याचे दिसते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews