आळंदीत 17 वर्षांनी पार पडला तुकोबाराय आणि माऊलींच्या भेटीचा सोहळा, नेमकी परंपरा काय?

Written by:Smita Gangurde
Published:
यावर्षी या दोन संतांची भेट व्हावी अशी इच्छा वारकऱ्यांच्या वतीनं आळंदी देवस्थाननं देहू देवस्थानला केली होती. देहू देवस्थाननं हे निमंत्रण स्वीकारल्यानं आळंदीत संतभेटीचा सोहळा भाविकांना अनुभवता आला.
आळंदीत 17 वर्षांनी पार पडला तुकोबाराय आणि माऊलींच्या भेटीचा सोहळा, नेमकी परंपरा काय?

आळंदी- आषाढी वारीचा सोहळा नुकताच पार पडला. वारीवरुन परत येताना आळंदीत सुमारे १७ वर्षांनी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबाराय या संत भेटीचा सोहळा जुळून आला. अनेक वर्षांनी झालेला हा सोहळा पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

संत ज्ञानेश्वर महाराजांचं 750 वं जन्मवर्ष आणि तुकाराम महाराजांचं 375 वं वैकुंठ मगन वर्षाचं औचित्य साधून ही परंपरा पुन्हा एकदा सुरु झाली. पहाटे साडे पाचच्या सुमारास तुकाराम महाराज आणि माऊलींची भेट झाली. त्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी देहूकडे रवाना झाली.

जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

1685 साली तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या काळी तुकाराम महाराजांच्या पालखीचा सोहळा पंढरपूरहून येताना आळंदीमार्गे होत असे. या आठवणींना या संतभेटीच्या प्रसंगानं उजाळा मिळाला. 2008 साली मागच्या वेळी पालखी आळंदीमार्गे देहूला आली होती. त्यावेळी चिखली आणि टाळगाव परिसरात नागरिकांनी भव्य स्वागत केलं होतं. यंदाही ही परंपरा जपली गेली.

जुनी परंपरा नव्यानं सुरु होणार

पूर्वी संत तुकाराम महाराज आळंदीत माऊलींचे दर्शन घेऊन पंढरपूरला मार्गस्थ होत असत. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी पालखी सोहळा सुरु केला. 1685 पासून देहूमधून संत तुकारामांच्या पादुका घएऊन पालखी आळंदीत येत असे. नंतर माऊली आणि तुकोबांच्या पालखअया एकत्रित पंढरपूरला रवाना होत असत. त्यानंतर ही परंपरा खंडित झाली. पुढे हैबतबाबा आरफळकर यांनी 1832 मध्ये स्वतंत्रपणे माऊलींच्या पालखीचा सोहळा सुरु केला. त्यानंतर दोन्ही संतांच्या पालख्यांचे मार्गही बदलले गेले.

या दोन्ही संतांच्या पालखीत लाखो वारकरी दरवर्षी सहभागी होतात. यावर्षी या दोन संतांची भेट व्हावी अशी इच्छा वारकऱ्यांच्या वतीनं आळंदी देवस्थाननं देहू देवस्थानला केली होती. देहू देवस्थाननं हे निमंत्रण स्वीकारल्यानं आळंदीत संतभेटीचा सोहळा भाविकांना अनुभवता आला.