मुंबई- श्रावण हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. धार्मिकदृष्ट्या या सणाला विशेष महत्त्व आहे. ११ ऑगस्ट रोजी तिसरा श्रावणी सोमवार आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार आणि शनिवारी उपवास आणि पूजा-अर्चा करण्याची प्रथा आहे. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण केली जाते. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ आणि तिसऱ्या सोमवारी मुगाची शिवामूळ अर्पण करण्याची प्रथा आहे. या सोमवारी शंकराच्या पिंडीला मुगाची शिवामूठ अर्पण करण्यात येईल.
मुगाची शिवामूठ वाहण्याचं महत्त्व काय?
सोमवार हा महादेवाचा वार मानण्यात येतो. श्रावणात या सृष्टीवर शंकराचं लक्ष असतं असं सांगण्यात येतं. शंकर हरीतप्रिय आहेत असं मानण्यात येतं. त्यामुळे हिरव्या रंगाच्या वस्तू शंकराला वाहण्याची श्रावणात प्रथा आहे. यात बेलाची पानं, मूग यांचा समावेश होतो. मूग हिरवे असल्यामुळे श्रावणातील तिसऱ्या सोमवारी ही शिवामूठ वाहिली जाते. शंकाराला मूग अर्पण केल्यामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होतात, अशी श्रद्धा आहे. कर्जमुक्ती होते, घरात समाधान नांदतं असंही सांगण्यात येतं.
श्रावण आणि पौराणिक काळ
श्रावण हा हिरव्यागार ऋतुचा महिना आहे. कडधान्य या काळात परिपक्व झालेली असतात. पौराणिक काळापासून श्रावण मासात धार्मिक कार्य, सण-उत्सवांची परंपरा आहे. पूर्वीच्या कृषीप्रधान संस्कृतीत आलेलं पहिलं पिक हे शंकराला वाहण्याची प्रथा आहे. त्यातून पीक समृद्धी आणि निसर्गाबाबत ऋण व्यक्त करण्याची भावना आहे. त्यामुळेच मुगाची शिवामूठ शंकराला वाहण्याची परंपरा पूर्वीपासून सुरु असल्याचं मानण्यात येतं.
मूग वाहण्यामागे पोषणमूल्यांचाही संदेश आहे. आरोग्यदायी, पचनकारक आणि प्रथनयुक्त अशी मुगाची ओळख आहे. या शिवामूठ अर्पणानंतर मुगाचा प्रसाद ग्रहण केल्यामुळे आरोग्य वृद्धिंगत होते अशीही धारणा आहे.
शिवामूठ वाहण्यामागची धारणा
श्रावणात प्रत्येक सोमवारी एक मूठ धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे. नवविवाहित महिलांना ही शिवामूठ वाहण्यास सांगितलं जातं. यामुळे सासरच्या मंडळींची माया या महिलेला मिळते असं सांगण्यात येतं. शिवामूठ लाहण्यामागे धार्मिक आणि सानाजिक अशी दोन्ही कारणे आहेत. श्रावणाच्या काळात बहरणारी पिकं, धान्य यांतील मूठभर धान्य देवाला अर्पण करुन त्याच्या सेवनाची ही परंपरा आहे. नव्या सुनेला घरात मिसळण्यासाठीही या शिवामूठ परंपरेत महत्त्व दिलं जातं.





