गणेशभक्तांसाठी आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. लाडक्या बाप्पाची 11 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर लाडक्या गणरायाचे विसर्जन केले जाणार आहे. राज्यभरातील घरगुती तसेच सार्वजनिक मंडळातील गणपतींना निरोप देण्यात येणार असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. गणेश विसर्जनाबाबत सविस्तर जाणून घेऊ…
राज्यभरात आज श्री गणेशाचे विसर्जन
भक्तांना आशिर्वाद देणारा गणपती बाप्पा आता पुन्हा घरी निघाला असून गणरायासाच्या विसर्जनासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झाला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार अून त्यासाठी बरीच तयारी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनही विसर्जनासाठी सज्ज झाले असून विविध ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे. चार हजार कॅमेरे पोलीस दल आणि दामिनी पथक सज्ज आहे. तर चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीची लगबग सुरू झाली असून उत्तर पूजा झाल्यानंतर अकरा वाजता विसर्जन मिरवणूक निघेल. 105 वर्षाची परंपरा असलेल्या चिंचपोकळीचा चिंतामणी या गणरायाची आरतीच्या तालावर विसर्जन मिरवणूक काढली जाते.
गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि विधी
अनंत चतुर्दशी २०२५ : गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त
– सकाळचा शुभ मुहूर्त : सकाळी ७:२६ ते ९:१० पर्यंत.
– दुपारचा लाभ मुहूर्त : दुपारी १:५४ ते ३:२८ पर्यंत.
– दुपारचा अमृत मुहूर्त : दुपारी ३:२८ ते ५:०३ पर्यंत.
– संध्याकाळचा लाभ मुहूर्त : संध्याकाळी ६:३७ ते ८:०३ पर्यंत.
– रात्रीचा शुभ मुहूर्त: रात्री ९:२९ ते १०:५५ पर्यंत.
– अमृत काळ : दुपारी १२:५० ते २:२३ पर्यंत.
– गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी ६:३७ ते ७:०० पर्यंत.
बाप्पाच्या विसर्जनाची योग्य पद्धत
गणेश विसर्जनाच्या दिवशी विधीवत पूजा झाल्यावर घरात हवन करा. नंतर एक लाकडी चौरंग घ्या. त्यावर स्वस्तिक काढा आणि अक्षता ठेवा. मग त्यावर लाल रंगाचं कापड अंथरा. कापडाच्या चारही बाजूंना सुपारी ठेवा. मग जयघोष करत गणपतीची मूर्ती या चौरंगावर ठेवा. गणपतीची पुन्हा आरती करा आणि त्यांना नैवेद्य दाखवा. त्यांच्यासमोर फळ आणि मोदक ठेवा. गणपतीला नवीन वस्त्रं घाला. गणपती बाप्पाला प्रार्थना करा. पूजेत काही चूक झाली असल्यास माफी मागा मग गणपतीच्या उजव्या कानात तुमची इच्छा सांगा आणि जयघोष करत बाप्पाला आपल्या पूर्ण घरात फिरवा आपले घर त्यांना दाखवा मग बाप्पाला विसर्जनाच्या ठिकाणी घेऊन जा. विसर्जनाच्या वेळेस गणपतीची कापूर आरती करा. मग त्यांचं विसर्जन करा.
Note: वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.





