Tourism News : फक्त 13 हजारांत श्रीशैलम दर्शनाची संधी; भाविकांसाठी रेल्वेचे खास टूर पॅकेज

Published:
आंध्र प्रदेशातील सुप्रसिद्ध श्रीशैलम मंदिरासह हैद्राबाद आणि यदाद्री येथील देवस्थळांचे दर्शन या पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. प्रवास, निवास, भोजन, स्थानिक कॅब आणि विमा अशा अनेक सुविधा एकाच पॅकेजमध्ये उपलब्ध असल्याने प्रवाशांना स्वतंत्र बुकिंगची गरज राहत नाही
Tourism News : फक्त 13 हजारांत श्रीशैलम दर्शनाची संधी; भाविकांसाठी रेल्वेचे खास टूर पॅकेज

श्रीशैलमच्या दर्शनाची योजना आखणाऱ्या भाविकांसाठी भारतीय रेल्वेकडून एक किफायतशीर आणि सोयीस्कर पर्याय जाहीर करण्यात आला आहे. दक्षिण भारतातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना एकाच प्रवासात भेट देता यावी यासाठी रेल्वेने विशेष टूर पॅकेज तयार केले असून त्याला मोठी मागणी अपेक्षित आहे.

आंध्र प्रदेशातील सुप्रसिद्ध श्रीशैलम मंदिरासह हैद्राबाद आणि यदाद्री येथील देवस्थळांचे दर्शन या पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. प्रवास, निवास, भोजन, स्थानिक कॅब आणि विमा अशा अनेक सुविधा एकाच पॅकेजमध्ये उपलब्ध असल्याने प्रवाशांना स्वतंत्र बुकिंगची गरज राहत नाही.

*तीन रात्री-चार दिवसांचा संपूर्ण धार्मिक प्रवास*

हा टूर हैद्राबादहून सुरू होतो आणि एकूण चार दिवसांचा आहे. रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी इच्छुकांना यात सहभागी होता येते. संपूर्ण प्रवासात कॅबद्वारे दर्शन आणि फिरस्तीची सुविधा मिळते. त्यामुळे पहिल्यांदाच दक्षिण भारतातील धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्यांसाठीही हा प्रवास सोपा ठरतो.

या पॅकेजचं अधिकृत नाव ‘Spiritual Telangana with Srisailam’ असं असून, या नावाने शोध घेतल्यास संपूर्ण तपशील सहज उपलब्ध होतो. बुकिंग भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर करता येतं.

*खर्च किती?*

प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन रेल्वेने पॅकेजची किंमत ठरवली आहे.

* तीन जणांच्या गटासाठी प्रति व्यक्ती सुमारे १३,५०० रुपये
* दोन जणांनी प्रवास केल्यास प्रति व्यक्ती अंदाजे १५,८८० रुपये
* मुलांसाठी शुल्क साधारण ९,८६० रुपये

कमी किमतीत सुरक्षित आणि व्यवस्थित दर्शनाची संधी मिळत असल्याने हे पॅकेज कुटुंबांसाठी आकर्षक मानलं जात आहे.

*कोणत्या सुविधा पॅकेजमध्ये नाहीत?*

प्रवासातील अनेक सोयी दिल्या असल्या तरी काही बाबी पॅकेजमध्ये समाविष्ट नाहीत.

* दुपारचे जेवण किंवा अतिरिक्त खाद्यपदार्थ
* रेल्वे, बस किंवा विमानाची मुख्य तिकिटे
* रामोजी फिल्म सिटीसारख्या स्थळांचे प्रवेश शुल्क
* स्वतंत्र टूर गाईड
* हॉटेलमधील मिनरल वॉटर, फोन कॉल्स, लॉन्ड्री यांसारखे वैयक्तिक खर्च

या सर्व सुविधा प्रवाशांनी स्वतंत्ररित्या कराव्या लागतात.

*बुकिंगपूर्वी लक्षात ठेवा*

IRCTCच्या टूर पॅकेजमध्ये कोणत्या सुविधा समाविष्ट आहेत आणि कोणत्या नाहीत, याची माहिती बुकिंगपूर्वी नीट वाचणे आवश्यक आहे. अटी आणि शुल्कांची माहिती समजून घेतल्यास प्रवास निर्दोष आणि निर्विघ्न पार पडतो.

एकूणच, कमी खर्चात दक्षिण भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी देणारा हा टूर भाविकांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews