Jyestha Gauri Awahan 2025: देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर घरात गौराईचे आगमन होते. ‘आली गवर आली… सोनपावली आली’ असे म्हणत गौराईला घरात आणले जाते. गणरायाप्रमाणेच गौराईच्या आगमनासाठीदेखील महिला तितक्याच उत्साहाने तयारी करत असतात. अगदी देवी गौरीच्या साजशृंगारापासून ते पंचपक्वान्नापर्यंत प्रत्येक गोष्टीकडे महिलांचे लक्ष लागून असते.
असे म्हटले जाते की, गौराई देवी आपल्या घरात येताना सुखसमृद्धी आणि आनंद घेऊन येते. मान्यतेनुसार देवी गौराई आपल्या बहिणीसोबत घरी येते. त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा असे संबोधले जाते. अनेक ठिकाणी गौरीला महालक्ष्मीचे स्वरूपदेखील म्हणतात. गौरीच्या या दोन दिवसांत सुहासिनी महिला एकत्रित येऊन गौरी आवाहन करतात. पारंपरिक गाणी म्हणतात, झिम्मा-फुगडीसारखे पारंपरिक खेळ खेळले जातात. मुली पारंपरिक साड्या नेसून मराठमोळा साजशृंगार करून गौराईला घरी आणतात.
यंदा २७ ऑगस्टपासून गणेश चतुर्थीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता महिलांना गौराई घरी आणण्याचे वेध लागले आहेत. यंदा गौराई कधी येणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. आज आपण गौराई घरी येण्याची तारीख, मुहूर्त याबाबत जाणून घेणार आहोत.
यंदा गौराई कधी येणार?
धार्मिक मान्यतेनुसार देवी गौरी तीन दिवसांसाठी आपल्या माहेरी येते. यामध्ये पहिल्या दिवशी जेव्हा गौराई घरी येते तेव्हा त्याला गौरी आवाहन असे म्हटले जाते. दुसऱ्या दिवशी देवी गौराईची पूजा करून नैवेद्य दाखवून हळदी-कुंकूचा कार्यक्रम केला जातो. आणि तिसऱ्या दिवशी गौराईचे विसर्जन केले जाते. त्याचप्रमाणे यंदा ३१ ऑगस्टला गौराई घरी येणार आहेत. १ सप्टेंबरला गौरी पूजन केले जाईल आणि २ सप्टेंबरला देवी गौराईचे विसर्जन होईल.
गौरी आवाहन- ३१ ऑगस्ट
गौरी पूजन- १ सप्टेंबर
गौरी विसर्जन- २ सप्टेंबर
गौरी शुभ मुहूर्त-
गौरी आवाहन- रविवार ३१ ऑगस्ट, सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांपर्यंत
गौरी पूजन- सोमवार १ सप्टेंबर, सकाळी ५ वाजून ५९ मिनिटे ते सायंकाळी ६ वाजून ४३ मिनिटांपर्यंत
गौरी विसर्जन- मंगळवार २ सप्टेंबर, रात्री ९ वाजून ५० मिनिटांपर्यंत





