धक्कादायक! राहुरी, टेंभूर्णीत 66 लाखांच्या बनावट नोटा जप्त; मशिनरी पोलिसांच्या ताब्यात

Written by:Rohit Shinde
Published:
राहुरी शहरात बनावट नोटा छापण्याच्या रॅकेटचा मोठा पर्दाफाश करण्यात आला आहे. राहुरी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई केली.
धक्कादायक! राहुरी, टेंभूर्णीत 66 लाखांच्या बनावट नोटा जप्त; मशिनरी पोलिसांच्या ताब्यात

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात बनावट नोटा छापण्याच्या रॅकेटचा मोठा पर्दाफाश करण्यात आला आहे. राहुरी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई केली. यामध्ये तीन संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रतीक पवार, राजेंद्र चौगुले आणि तात्या विश्वनाथ हजारे यांचा समावेश आहे. तसेच या बनावट नोटांचे सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णीशी असलेले कनेक्शन देखील उघड झाले आहे.

66 लाखांच्या बनावट नोटा जप्त

पोलिसांनी संबंधित प्रकरणातील तीन आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आढळून आल्या. चौकशीत त्यांनी कबूल केले की, या नोटा सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे तयार करण्यात आल्या होत्या. त्यानुसार राहुरी पोलिसांनी तातडीने टेंभुर्णीतील एका ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत तब्बल 66 लाख रुपयांच्या नकली नोटा, विशेष प्रकारचा कागद, नोटा छापण्यासाठी वापरली जाणारी प्रिंटिंग मशीन, झेरॉक्स मशीन आणि इतर उपकरणे हस्तगत करण्यात आली आहेत.

प्रकरणाची सखोल चौकशी सुरू

आरोपींना अटक करून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे बनावट पैसे नेमके कुठे वितरित होणार होते? आधी किती नोटा बाजारात सोडण्यात आल्या? आणि या गुन्ह्यात आणखी कोण कोण सहभागी आहे? याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. ही कारवाई पोलिसांसाठी मोठं यश मानली जात असून, बनावट चलनाविरोधात प्रशासनाची दक्षता अधिक तीव्र झाली आहे. नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.