महाराष्ट्राचं मानसिक संतुलन बिघडतंय का, असा प्रश्न पडावा, अशा घटना महाराष्ट्रात घडतायेत. मुंबईत लोकलमध्ये किरकोळ वादातून प्राध्यापकाच्या हत्येच्या घटनेसोबतच नालासोपाऱ्यात आईनंच पोटच्या मुलीची हत्या केल्याची घटना समोर आलीय. दुसरीकडं पुण्यात दागिन्याची मागणी केल्यानं पतीनं पतीची हत्या केली.
प्राध्यापकाच्या मृत्यूने मुंबई हादरली..
मुंबईत लोकलमध्ये किरकोळ वादातून प्राध्यापकाची हत्या घडल्याची धक्कादायक घडलेली असतानाच, अशाच संतापातून घडलेल्या घटनांनी महाराष्ट्र हादरलाय. नालासोपाऱ्यात आईनंच पोटच्या १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. संतोषभुवन परिसरात विद्या विकास मंडळ चाळ परिसरात हा प्रकार घडलाय. अंबिका प्रजापती या मुलीला मारहाण करताना आरोपी आई कुमकुम प्रजापती हिनंरागाच्या भरात आपल्या पोटच्या मुलीचा थेट गळा चिरला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेण्यात आलं असून, आईनं एवढं टोकाचं पाऊल का उचललं, याचा तपास आता करण्यात येतोय.
पुण्यात वाडेबोल्हाई भागात पतीनं दागिन्यांवरुन झालेल्या वादातून पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडलीय. शैलेंद्र व्हटकर या आरोपीनं पत्नी नम्रताला भेटण्यासाठी बोलावून घेतलं होतं. यावेळी दोघांमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून वाद झाला. वादाच्या भरात शैलेंद्रने नम्रता हिच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर चाकूनं सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाली झालेल्या नम्रता यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. लोणीकंद पोलिसांनी शैलेंद्र व्हटकरला ताब्यात घेतलं असून, हा प्रकार का घ़डला याचा शोध आता घेण्यात येतोय.
उल्हासनगर कॅम्प 4 मधील सुभाष टेकडी परिसरात क्रिकेट टूर्नामेंट पाहण्यावरून झालेल्या वादाचं रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झालं. यावेळी तलवारीनं केलेल्या हल्ल्यात रोहित नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी झालेला रोहित क्रिकेट टूर्नामेंट पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी आरोपी सुमित आणि रोहित यांच्यात वाद झाला. रोहितचा भाऊ आणि मित्रांनी मध्यस्थी करत हा मिटवला. त्यानंतर रात्री साडे आठच्या सुमारास राहुल पुन्हा क्रिकेट सामना पाहण्यासाठी आला असता, सुमितने आपल्या मित्रांसह रोहितवर थेट तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात रोहित गंभीर जखमी झाला. त्याला तातडीनं मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात सुमित आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित आणि त्याचे साथीदार सध्या फरार आहेत
महाराष्ट्राचं मानसिक संतुलन बिघडतंय का?
जालन्यात पोटात चाकू भोसकून 18 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंबड तालुक्यातील पारनेर फाटा परिसरातील या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पवन संतोष बोराटे असं मृत तरुणाचं नाव आहे. तर राहुल खरे असं हल्लेखोर तरुणाचं नाव आहे. राहुलच्या बहिणीला पवननं चिठ्ठी दिल्याच्या किरकोळ कारणातून ही हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. रागाच्या भरात पवनच्या पोटात चाकूने दोन गंभीर वार करण्यात आले. पवनचे वडील संतोष बोराटे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला तत्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता करण्यात येतेय. महाराष्ट्रात घडलेल्या चारही घटना हादरवून टाकणाऱ्या आहेत. किरकोळ वादातून हल्ला आणि हत्येसारख्या घटना घडताना दिसतायेत. राज्यभरातल्या या घटनांनी महाराष्ट्राचं मानसिक संतुलन बिघडतंय का असा प्रश्न निर्माण झालाय. केवळ मुंबईसारख्या शहरातच नाही तर ग्रामीण भागातही किरकोळ वादातून हाणामाऱ्या, खुनांचे प्रकार वाढतायेत. अशा परिस्थितीत अनेकांचं समुपदेशन होण्याची गरज आहे. मात्र समुपदेशासाठी योग्य व्यासपीठं आणि जागरुकता यांचा अभाव आहे. सातत्यानं आजूबाजूला घडणाऱ्या अशा घटना थांबवण्यासाठी कायमस्वरुपी उपाय करण्याची गरज व्यक्त होतेय.





