Mon, Dec 22, 2025

पुणेकरांसाठी मोठी बातमी; उद्यापासून मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये होणार वाढ, वेळापत्रकातील बदल जाणून घ्या!

Written by:Rohit Shinde
Published:
पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर मिळून 490 फेऱ्या चालवल्या जातात. आता गर्दीच्या वेळेत दर 6 मिनिटांनी ट्रेन धावणार असून, यामुळे अतिरिक्त 64 फेऱ्यांची भर पडेल.
पुणेकरांसाठी मोठी बातमी; उद्यापासून मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये होणार वाढ, वेळापत्रकातील बदल जाणून घ्या!

पुणे मेट्रो हे पुणेकरांसाठी आधुनिक, जलद आणि सोयीस्कर प्रवासाचे साधन ठरत आहे. शहरातील वाढती वाहतूक आणि ट्रॅफिक जाम कमी करण्यासाठी मेट्रोची उभारणी झाली आहे. पुणेकरांसाठी ही सेवा वेळ वाचवणारी, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित आहे. मेट्रोच्या माध्यमातून कात्रज ते हिंजवडी, शिवाजीनगर ते पिंपरी-चिंचवड यासारख्या महत्त्वाच्या भागांना जलद जोडणी मिळत आहे. प्रवाशांना स्वच्छ, वातानुकूलित आणि आरामदायी डबे उपलब्ध आहेत. पर्यटकांसाठीही हा प्रवास अनुभव अनोखा आहे. भविष्यात मेट्रोचा विस्तार झाल्यास पुणेकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सोपा, जलद आणि आनंददायी होईल, अशी अपेक्षा आहे. असे असताना आता मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या 15 ऑगस्टपासून मेट्रोचे नवे वेळापत्रक लागू होणार आहे.

मेट्रोच्या 64 फेऱ्या वाढणार!

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर मिळून 490 फेऱ्या चालवल्या जातात. आता गर्दीच्या वेळेत दर 6 मिनिटांनी ट्रेन धावणार असून, यामुळे अतिरिक्त 64 फेऱ्यांची भर पडेल. त्यामुळे 15 ऑगस्टपासून एकूण फेऱ्यांची संख्या 554 वर पोहोचणार आहे. या बदलामुळे प्रवाशांना गर्दीचा त्रास होणार नाही. सध्या गर्दीच्या वेळेत म्हणजे सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 या कालावधीत दर 7 मिनिटांनी ट्रेन चालते. परंतु नव्या वेळापत्रकानुसार गर्दीच्या वेळी दर 6 मिनिटांनी, तर विना गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी ट्रेन सेवा उपलब्ध असेल.

पुण्यात वाहतूक नियमनाचे प्रयत्न

दरम्यान, पुणे महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 312 किमी मेट्रो मार्ग, 80 किमी बीआरटीएस मार्ग, 46 किमी बस मार्ग, 12 टर्मिनलचा पुनर्विकास आणि 19 उड्डाण पूल उभारण्याचे मोठे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. या प्रकल्पांची अंदाजित किंमत सुमारे ₹1,33,535 कोटी आहे. हा आराखडा ‘पीएमआरडीए’ने एल अँड टीच्या मदतीने तयार केला होता, ज्यात महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने सुधारणा करून शिफारसी समाविष्ट केल्या आहेत. या सर्व उपक्रमांमुळे पुणे आणि परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होऊन प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

त्यामुळे किमान आगामी काही वर्षांमध्ये तरी यामध्ये काही प्रमुख बदल होतात, का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पुण्यातील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हजारो कोटींचे बजेट लावले जात असूनही वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघताना दिसत नाही.