देशभरात मतदार याद्यांमधील वाढलेले घोळ आणि मतचोरीचे आरोप ही लोकशाहीसाठी गंभीर चिंतेची बाब ठरत आहे. अनेक ठिकाणी मृत व्यक्तींची नावे, दुहेरी नोंदी, स्थलांतरित मतदारांची चुकीची नोंद तसेच अपात्र व्यक्तींचा समावेश झाल्याचे आरोप होत आहेत. यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही राजकीय पक्षांनी मतदार याद्यांमध्ये जाणीवपूर्वक फेरफार केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मतदारांचा विश्वास टिकवण्यासाठी याद्यांचे नियमित अद्ययावतकरण, तांत्रिक सुधारणा आणि कडक देखरेख आवश्यक आहे. अशा संपूर्ण परिस्थितीत पनवेलमधून एक वेगळीच आणि धक्कादायक अशी घटना समोर आली आहे.
पनवेलमध्ये मतदार यादीत मोठा घोळ ?
पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग 2 साठी मतदार यादीत 268 मतदारांची नोंद झाल्यानंतर एका एकट्या वडिलांचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. शेकाप नेते अरविंद म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून याला निवडणूक कट रचल्याचे म्हटले आहे. नवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 च्या मतदार यादीत एक धक्कादायक विसंगती आढळून आली आहे. 268मुलांची नोंदणी एकाच वडिलांच्या नावाने झाल्याचे आढळून आले आहे. हा केवळ तांत्रिक बिघाड नसून एक गंभीर घोटाळा असल्याचा आरोप आहे.
शेकापचा मतदार यादीवर थेट आक्षेप
शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी या प्रकरणी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की, मतदार यादीतील 168 नावे बहुतेक उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील तरुणांची आहेत. जरी ते सर्व प्रत्यक्षात पनवेलमध्ये राहत नसले तरी, त्यांची एकाच पत्त्यावर मतदार म्हणून नोंदणी आहे. म्हात्रे म्हणाले की, एकाच वडिलांच्या नावावर इतक्या मोठ्या संख्येने नोंदी लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. अरविंद म्हात्रे यांनी पुढे सांगितले की, ही किरकोळ प्रशासकीय चूक नव्हती, तर निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता. स्थानिक मतदार यादीत बाहेरील राज्यांतील लोकांची नावे समाविष्ट करून निवडणुकीत गोंधळ घालण्याचे हे षड्यंत्र असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला. त्यामुळे आता पुढे या प्रकरणात नेमकं काय होतं, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.





