भारतातील सर्वात मोठा घोडे बाजार आपल्या महाराष्ट्रात भरतो. नंदुरबारमधील सारंगखेडा यात्रेला सुरुवात झाली. येथे भरणारा घोडेबाजार अर्थता चेतक फेस्टिवलची देशभरात चर्चा असते. या चेतक फेस्टिवल मध्ये 14 राज्यातून अश्व दाखल झाले आहेत. या सारंगखेडा यात्रेमध्ये पन्नास हजारापासून तर पाच कोटी पर्यंतचे घोडे विक्रीसाठी दाखल होत असतात या घोडा बाजारातून कोट्यवधी रुपयाची उलाढाल होत असते त्यामुळे अश्वप्रेमी एकदा तरी या सारंगखेडाच्या चेतक फेस्टिवल आणि अश्व बाजाराला भेट देत असतात.
सारंगखेडा घोड्यांचा बाजार, कोट्यवधींची उलाढाल
सारंगखेडा घोडेबाजारात यंदा 4.24 कोटी रुपयांची ऐतिहासिक उलाढाल झाली. 756 घोड्यांची विक्रमी विक्री झाली असून, या यात्रेला ‘अश्वपंढरी’ म्हणून ओळख मिळाली आहे. दक्षिण भारतातील व्यापारी मोठ्या संख्येने येऊन दर्जेदार घोड्यांची खरेदी करत आहेत, ज्यामुळे हा बाजार देशातील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध घोडेबाजार बनला आहे. अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडाच्या यात्रेत यंदा तब्बल 756 अश्वांची विक्री झाली असून त्यातून थोडीथोडकी नव्हे तर 4 कोटीं पेक्षा जास्त उलाढाला झाली आहे. सारंगखेडाच्या घोडेबाजारात यावर्षी सर्वाधिक घोडे दक्षिण भारतातील व्यापाऱ्यांनी घेतले आहेत.
दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या उटी, कर्नाटकातील बेंगलोरु येथून व्यापारी येऊन सर्वाधिक घोडे घेऊन गेले आहेत. सारंगखेडा येथे सर्व जातीचे आणि सर्वात स्वस्त घोडे मिळत असतात, यासाठी दक्षिण भारतातील व्यापारी सारंगखेड्याच्या यात्रेला येऊ लागले आहेत. सारंगखेड्याची यात्रा ही देशात सर्वात मोठी घोडेबाजारांसाठी प्रसिद्ध यात्रा आहे. या यात्रेत जातीवंत आणि उमदे घोडे विक्रीसाठी येत असतात तर देशातील विविध राज्यातून घोडे मालक आपले घोडे विक्रीसाठी आणि खरेदीसाठी इथे येतात, त्यामुळे सारंगखेडा यात्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली आहे.
सारंगखेडा घोडे बाजाराचा इतिहास नेमका काय ?
सारंगखेडा हे महाराष्ट्रात तील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तापी नदीच्या किनाऱ्यावर असलेले एक गाव आहे. सारंगखेडा हे तेथे १८व्या शतकापासून दरवर्षी भरणाऱ्या घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. ‘शोले’ पासून ‘बाजीराव-मस्तानी’पर्यंतच्या चित्रपटांसाठी घोडे आणि घोडदळ पुरवणारा आणि अवघ्या पंधरा दिवसांत दहा ते पंधरा कोटींची उलाढाल करणारा खांदेशातील हा घोडेबाजार आहे. हा बाजार संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
आधी राजस्थानातील पुष्करला, मग पंढरपूरला तिथून मग सारंगखेड्याला हा बाजार येतो. इथून पुढे हा बाजार हलतो तो नांदेड जिल्ह्यातील माळेगावला आणि तिथून पुन्हा उत्तर महाराष्ट्रातल्या शिरपुराला येतो.देशभरात घोड्यांचा बाजार ठराविक ठिकाणी भरतो. महाराष्ट्रातील सारंगखेडा या गावी तापी नदीच्या काठावर दरवर्षी दत्तजयंतीला मोठी यात्रा भरते. सुमारे एक महिना ही यात्रा चालते. या यात्रेत भारतातील विविध ठिकाणांहून नानाप्रकारचे घोडे विक्रीसाठी आणले जातात. त्यांचा स्वतंत्र बाजार भरविला जातो. २००५ पासून ‘चेतक फेस्टिव्हल’ म्हणून याला ओळखले जाते. यात्रा संपल्यानंतरही तो महिनाभर चालू असतो.
या घोडेबाजाराचे संपूर्ण व्यवस्थापन शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून केले जाते. वेगवेगळ्या राज्यातील व्यापारी येथील पटांगणात भव्य शामियाना ठोकतात. घोड्यावरून रपेट करण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आलेली असते. असतो. घोड्यांना दुखापत झाल्यास उपचारासाठी पशुसंवर्धन विभाग कार्यरत असतो.
जवळपास ४०० वर्षांपासून हा घोडा बाजार भरत असून आजही तो तेवढाच कुतूहलाचा विषय आहे. या यात्रेचा इतिहास असा की, उत्तर आणि दक्षिण भागातील हे मध्यस्थ स्थान आहे. तापीकाठ हा पूर्वी समृद्ध किनारा होता. दक्षिण भागातील त्या काळातील राजे महाराजे त्यांच्या सैन्यासाठी घोडे खरेदी करायला इथे यायचे. तेव्हा भारत देश अखंड होता. शिवाय दळन-वळणासाठी घोड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. त्यामुळे अफगाणिस्तान, बलुचिस्तान, अरबस्तान अशा ठिकाणांहून ‘मारवाड’ जातीचे घोडे विकायला यायचे.
जातिवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा बाजाराने ही परंपरा आजही कायम ठेवली आहे. आजही या बाजारात महाराष्ट्रातील सांगली-सातारा भागातील (शरीराने छोटे असलेले) कृष्णाकाठचे ‘तट्टू’, राजस्थानातील मेवाडमधून आलेले ‘मारवाडी’, गुजरात मधील काठीयावाडचा ‘काठेवाडी’, सिक्कीमचा ‘भुतिया’, जम्मू-काश्मीरचा ‘झांझकरी’, मणिपूरचा ‘मणिपुरी’, हिमाचलचा ‘स्पिटी’, अरब देशाचा ‘अबलख’ आणि हरियाणा, मध्यप्रदेश, पंजाबसारख्या इतर बऱ्याच ठिकाणचे घोडे हमखास विक्रीला आणले जातात.





