Tue, Dec 30, 2025

भाविकांसाठी मोठी बातमी! सप्तश्रृंगी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले; त्र्यंबकेश्वरच्या दर्शन वेळेत बदल

Written by:Rohit Shinde
Published:
सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिक जिल्ह्यातील शक्तिपीठ आणि ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे सप्तश्रृंगी आणि त्र्यंबकेश्वराच्या दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे.
भाविकांसाठी मोठी बातमी! सप्तश्रृंगी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले; त्र्यंबकेश्वरच्या दर्शन वेळेत बदल

नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड आणि त्र्यंबकेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. सप्तश्रृंगी देवी हे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठ असून नवरात्र, सुट्ट्या आणि नववर्षाच्या काळात येथे लाखो भाविक दाखल होतात. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. श्रावण महिना, सोमवार, महाशिवरात्री यावेळी गर्दी अधिक वाढते. वाढत्या भाविक संख्येमुळे वाहतूक, दर्शन रांगा आणि सुरक्षेचे आव्हान निर्माण होत असून प्रशासनाकडून विशेष नियोजन केले जात आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना देखील गर्दी वाढत असल्याने आता दर्शनाच्या वेळेमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

सप्तश्रृंगी देवीच्या दर्शन वेळेत बदल

नाताळच्या सुट्ट्या, शाकंभरी नवरात्रोत्सव आणि सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिक जिल्ह्यातील शक्तिपीठ आणि ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. ही तुडुंब गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठे बदल केले आहेत. त्यामुळे भाविकांना दिलासा मिळणार आहे. कळवण तालुक्यातील श्रीक्षेत्र सप्तश्रृंगगड येथे दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ आणि समाधानकारक दर्शन मिळावे, यासाठी देवस्थान प्रशासनाने मंदिर 24 तास खुले ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर मंगळवार, 30 डिसेंबर 2025 ते रविवार, 4 जानेवारी 2026. या पाच दिवसांच्या काळात मंदिर दर्शनासाठी एक क्षणही बंद होणार नाही, ज्यामुळे भाविकांना गर्दीच्या त्रासाशिवाय दर्शन घेता येईल.

त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 4 वाजता खुले

दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरीच्या तटी, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासनाने द्वार उघडण्याची वेळ एक तास अलीकडे आणली आहे. नवीन वेळ: आता मंदिर पहाटे 5 ऐवजी पहाटे 4 वाजता उघडणार आहे. पहाटेची वेळ वाढवल्यामुळे सकाळी होणारी भाविकांची गर्दी विभागली जाईल आणि अधिक भाविकांना दर्शन घेता येईल. गर्दीच्या काळात शांतता राखावी, रांगेत उभे राहून शिस्तीचे पालन करावे आणि मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून सर्वांनाच आदिशक्ती आणि महादेवाचे दर्शन सुखकर होईल, असे आवाहन भाविकांना केले जात आहे.