बेन डकेटने लीड्समध्ये इतिहास रचला, असा पराक्रम करणारा इंग्लंडचा पहिलाच फलंदाज बनला

Published:
बेन डकेटने लीड्समध्ये इतिहास रचला, असा पराक्रम करणारा इंग्लंडचा पहिलाच फलंदाज बनला

इंग्लंडचा सलामी फलंदाज बेन डकेटने लीड्समध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जो पराक्रम याआधी इंग्लंडचा कोणताही फलंदाज करू शकला नव्हता, तो पराक्रम डकेटने करून दाखवला. भारताविरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लीड्समध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात डकेटने पहिल्या डावात अर्धशतक झळकावलं आणि दुसऱ्या डावात शानदार शतक ठोकलं. पण त्यांची कामगिरी एवढ्यावरच थांबली नाही. त्याने अशी कामगिरी केली आहे, जी आजवर टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात केवळ एकदाच घडली होती.

लीड्स कसोटीच्या चौथ्या डावात शतक झळकावणारा पहिला इंग्लिश ओपनर

लीड्समध्ये कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात ओपनिंग करताना शतक झळकावणारा पहिला इंग्लिश फलंदाज होण्याचा मान डकेटला मिळाला आहे. याआधी हे यश केवळ ऑस्ट्रेलियाच्या आर्थर मॉरिसला मिळालं होतं. त्यांनी 1948 साली इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटीत चौथ्या डावात 182 धावांची भक्कम खेळी केली होती. त्यानंतर तब्बल 77 वर्षांमध्ये कुणालाही लीड्समध्ये चौथ्या डावात शतक करता आले नव्हते. आता बेन डकेटने या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे.

पहिल्या डावात अर्धशतक, दुसऱ्या डावात ऐतिहासिक शतक

बेन डकेटने पहिल्या डावात 94 चेंडूंमध्ये 62 धावा केल्या होत्या, ज्यात 9 चौकारांचा समावेश होता. दुसऱ्या डावात त्यांनी 121 चेंडूंमध्ये रवींद्र जडेजाच्या चेंडूवर चौकार मारत शतक पूर्ण केलं. या खेळीत त्यांनी एकूण 14 चौकार ठोकले. दुसऱ्या टोकावरून त्यांना ओपनर झॅक क्रॉलीकडूनही भरपूर साथ मिळाली.

भारताविरुद्ध दुसरं टेस्ट शतक

बेन डकेटचं हे टेस्ट कारकिर्दीतील सहावं शतक आहे. भारताविरुद्ध त्याने दुसऱ्यांदा टेस्ट शतक झळकावलं आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने दोन शतकं केली आहेत, तर आयर्लंड आणि झिम्बाब्वेविरुद्ध प्रत्येकी एक शतक केलं आहे. डकेटचं टेस्ट कारकिर्द अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे, पण जर ते अशीच कामगिरी करत राहिला, तर तो इंग्लंडसाठी दीर्घकाळ टेस्ट क्रिकेट खेळू शकतो.