वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 चा थरार सध्या पाहायला मिळतोय. आज तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणार होता. मात्र भारत आणि पाकिस्तानचा हा सामना रद्द करण्यात आला आहे. त्याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार अनेक भारतीय खेळाडूंनी या सामन्यात खेळण्यास नकार दिल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. खरंतर पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी विचारात घेत भारतीय खेळाडूंनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. खेळाडूंच्या या निर्णयाचे स्वागत होताना दिसत आहे.
भारतीय खेळाडूंचा खेळण्यास नकार
भारतीय संघाच्या अनेक खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला. त्यानंतर आयोजकांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज होणारा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हरभजन सिंग, सुरेश रैना, इरफान पठण, युसूफ पठाण यांच्यासह भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास थेट नकार दिला. जम्मू-काश्मीरमधील पहलगामध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या संघासोबत खेळणार नसल्याचे सांगितले. युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये गेला आहे.
शाहिद आफ्रिदीला पाकिस्तान संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे, परंतु पहिल्या सामन्यात मोहम्मद हाफीजने पाकिस्तानचे नेतृत्व केले. दरम्यान, गेल्या हंगामात भारतीय संघाने पाकिस्तानला अंतिम फेरीत हरवून जेतेपद जिंकले होते.
Dear all , pic.twitter.com/ViIlA3ZrLl
— World Championship Of Legends (@WclLeague) July 19, 2025
पहलगामच्या जखमा ताज्या; चाहत्यांचा विरोध
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे पाकिस्तानच्या पाठिंब्याखालील दहशतवाद्यांनी 26 भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता. ही जखम अजूनही भरलेली नाही, पण वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार असल्याच्या बातमीनं भारतीय चाहत्यांमध्ये आक्रोश वाढवला होता. त्यानंतर आता हा निर्णय समोर आला आहे.
WCL ने नेमके काय दिले स्पष्टीकरण?
“आमचा हेतू फक्त जगभरातील चाहत्यांसाठी काही चांगल्या आठवणी तयार करण्याचा होता. मात्र, या निर्णयामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. विशेषतः भारताचे ज्येष्ठ क्रिकेटपटू, ज्यांनी देशासाठी मोठी कामगिरी केली आहे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. याशिवाय, आमच्या सोबत असलेल्या ब्रँड्सवरही याचा परिणाम झाला. त्यांच्या निखळ क्रीडाप्रेमामुळे त्यांनी आमच्याशी साथ दिली होती, पण या सर्व घडामोडींनी त्यांनाही अडचणीत आणले. त्यामुळे आम्ही ठरवले आहे की भारत-पाकिस्तान सामन्याला स्थगित करण्यात येईल.”






