टी20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, त्यात ईशान किशनची दुसऱ्या विकेटकीपर म्हणून निवड झाली आहे. सुमारे दोन वर्षांनंतर ईशानचे टी20 संघात पुनरागमन झाले आहे. या काळात त्याने संघर्षाचा मोठा टप्पा अनुभवला. बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून त्याला बाहेरही पडावे लागले होते. आता पुन्हा संघात निवड झाल्यानंतर ईशान किशनची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
इशान किशनची पहिली प्रतिक्रिया
टी-२० विश्वचषक संघात निवड झाल्याने इशान किशन खूप आनंदी होता. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना इशान म्हणाला, “मी खूप आनंदी आहे. संघात सामील होण्यास मी उत्सुक आहे.” किशन पुढे म्हणाला की, संघ खूप चांगला खेळत आहे.
ईशान किशनने इंस्टाग्रामवर एक स्टोरीही शेअर केली असून, त्याच्या कॅप्शनमध्ये “बॅक, बेटर” असे लिहिले आहे, म्हणजेच अधिक चांगल्या पद्धतीने केलेली पुनरागमन. ईशानच्या सध्याच्या उत्तम फॉर्मचा विचार करता त्याची टी20 वर्ल्ड कप संघात निवड करण्यात आली आहे. मात्र फॉर्मच्या कारणामुळे शुभमन गिलला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
#WATCH | Patna, Bihar | On his comeback to India’s squad for the ICC Men’s T20 World Cup 2026, Indian cricketer Ishan Kishan says, “I am very happy…” pic.twitter.com/R2oKsCd9U2
— ANI (@ANI) December 20, 2025
टी20 वर्ल्ड कपपूर्वी ईशान किशनचे पुनरागमन न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत होणार आहे. शनिवारी जाहीर करण्यात आलेला संघ वर्ल्ड कपसह न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या टी20 मालिकेसाठीही आहे. या टी20 मालिकेतील पहिला सामना २१ जानेवारी रोजी खेळवला जाणार असून, शेवटचा सामना ३१ जानेवारीला होणार आहे.
सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ईशान किशनची कामगिरी जबरदस्त राहिली होती. त्याच्या नेतृत्वाखाली झारखंड संघाने पहिलेच विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात ईशानने शतकी खेळी करत इतिहास रचला. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये शतक झळकावणारा तो पहिला कर्णधार ठरला. संपूर्ण स्पर्धेत ५०० पेक्षा अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज होता. ईशानने १० डावांत एकूण ५१७ धावा केल्या.
टी20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंह, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, ईशान किशन (विकेटकीपर).
७ फेब्रुवारी – विरुद्ध अमेरिका (मुंबई)
१२ फेब्रुवारी – विरुद्ध नामिबिया (दिल्ली)
१५ फेब्रुवारी – विरुद्ध पाकिस्तान (कोलंबो)
१८ फेब्रुवारी – विरुद्ध नेदरलँड्स (अहमदाबाद)
टी२० विश्वचषक २०२६ संघ
गट अ – भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया
गट ब – ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान
गट क – इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ, इटली
गट ड – न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, युएई.





