भारताची उगवती टेनिस स्टार राधिका यादवच्या हत्येच्या बातमीने संपूर्ण देश हादरून गेला आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे राधिकाची हत्या तिच्याच वडिलांनी गोळ्या झाडून केली आहे. ही घटना हरियाणाच्या गुरुग्राममध्ये घडली असून, राधिकाच्या वडिलांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे आणि त्यांनी आपला गुन्हा कबूलही केला आहे.

नीरज चोप्रा काय म्हणाला?

या घटनेवर भारताचे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते भालाफेकपटू नीरज चोप्राने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नीरज म्हणाला, “मी या विषयावर काही लोकांशी बोलत होतो. हरियाणामधून आधीही अनेक प्रतिभावान महिला खेळाडू पुढे आल्या आहेत आणि त्यांनी देशाचं नाव उज्वल केलं आहे. कुटुंबीयांनी एकमेकांना पाठिंबा द्यायला हवा. महिला खेळाडूंनी जे चांगलं काम केलं आहे, त्यातून प्रेरणा घ्यायला हवी.”

हत्या का झाली?

राधिकाचे वडील दीपक यादव यांनी पोलीस चौकशीत सांगितले की, त्यांना हे सतत ऐकून त्रास होत होता की ते आपल्या मुलीच्या कमाईवर जगत आहेत. तसेच, राधिकाने सुरू केलेल्या टेनिस अकादमीमुळे त्यांच्यात सतत वाद होत होते. आणखी एक कारण पुढे आले आहे की, राधिका सोशल मीडियावर रील्स बनवत असे आणि वडिलांना ते आवडत नसे.

राधिकाची हत्या कशी झाली?

१० जुलै रोजी, जी तिच्या आईचा वाढदिवस होता, त्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली. राधिका स्वयंपाकघरात काहीतरी बनवत असताना दीपक यादव यांनी तिच्यावर एकामागोमाग एक गोळ्या झाडल्या. जागीच तिचा मृत्यू झाला.

सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. भारतातील खेळाडू आणि जनतेमध्ये या घटनेमुळे तीव्र संताप आणि शोक व्यक्त केला जात आहे.