भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) बीसीसीआयने वनडे सामन्याच्या कर्णधार पदावरून काढून टाकले आणि त्याच्या जागी नवख्या शुभमन गिलला एकदिवसीय सामन्याचा कर्णधार बनवले. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली. ज्या रोहित शर्माने मागच्या काही वर्षात मजबूत असा भारताचा सर्व बनवला आणि टीम इंडियाला 2 आयसीसी ट्रॉफी जिंकवून दिल्या त्या रोहित शर्माला कर्णधार पदावरून का काढलं?? असा सवाल चाहत्यांकडून विचारला जातोय. रोहित शर्मा हा भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे, खासकरून वनडे आणि टी 20 मध्ये त्यांने चमकदार कामगिरी केलेली आहे. आज आपण कर्णधार म्हणून रोहित शर्मा विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांची आकडेवारी रेकॉर्ड जाणून घेऊया.
रोहित शर्माचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड – Rohit Sharma
रोहित शर्माला डिसेंबर 2021 मध्ये भारतीय संघाचा फुल टाईम कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने एकूण 56 वनडे सामने खेळले. यामधील 42 सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळाला, तर फक्त 12 सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला. एक सामना बरोबरीत सुटला आणि एक रद्द झाला होता. कर्णधार म्हणून रोहितचा (Rohit Sharma) विनिंग रेकॉर्ड तब्बल 75 टक्के राहिला. महत्वाची बाब म्हणजे रोहितच्याच नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि T 20 वर्ल्डकप जिंकला होता.
विराट कोहलीचा रेकॉर्ड
विराट कोहली हा भारतीय क्रिकेटचा खरा आधारस्तंभ… मात्र कर्णधार म्हणून तो रोहित पेक्षा वरचढ कधीच वाटला नाही. जेव्हा महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडले तेव्हा विराटला कॅप्टन करण्यात आलं होतं. 2017 ते 2021 या काळात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने एकूण 95 वनडे सामने खेळले. यामधील 65 सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला तर 27 सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी 68.42 इतकी होती.
महेंद्रसिंग धोनीची विजयाची टक्केवारी –
महेंद्रसिंग धोनी हा भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. 2011 चा वर्ल्डकप भारताने धोनीच्याच नेतृत्वाखाली जिंकला. महेंद्रसिंग धोनी नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकूण 200 एकदिवसीय सामने खेळले. त्यापैकी 110 सामने टीम इंडियाने जिंकले आणि 74 सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला. यातील 5 सामने बरोबरीत सुटले आणि 11 सामने रद्द झाले. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या विजयाची टक्केवारी 55 टक्के होती.
एकूणच काय तर विराट कोहली महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्या कर्णधारपदाच्या काळातील टीम इंडियाच्या विजयाची टक्केवारी बघितली तर यात रोहित शर्मा आघाडीवर पाहायला मिळत आहे.






